सिंचन अनुशेषातील २६ प्रकल्प प्राधान्य यादीत
By Admin | Updated: June 8, 2015 00:24 IST2015-06-08T00:24:39+5:302015-06-08T00:24:39+5:30
जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी अपूर्ण असलेल्या ३३ सिंचन प्रकल्पांपैकी २६ प्रकल्पांचा समावेश ..

सिंचन अनुशेषातील २६ प्रकल्प प्राधान्य यादीत
व्यथा सिंचनाची : ३३ पैकी २६ प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण होणार
अमरावती : जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी अपूर्ण असलेल्या ३३ सिंचन प्रकल्पांपैकी २६ प्रकल्पांचा समावेश राज्य शासनाने प्राधान्यक्रम यादीत केला आहे. सिंचन अनुशेषांतर्गत असलेल्या जिल्ह्यातील रखडलेल्या ३३ सिंचन प्रकल्पांपैकी येत्या तीन वर्षांत २६ सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण केले जाणार आहे.
जलसंपदा विभागाच्या वार्षिक आराखड्यात अमरावतीसह विभागातील ६६ सिंचन प्रकल्प प्राधान्यक्रमाने पूर्ण केले जाणार आहेत. सध्या १२० सिंचन प्रकल्प अपूर्ण कामांमुळे रखडून पडलेले आहेत.
हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने निधीची तरतूद करण्याची घोषणा केली. अमरावती जिल्ह्यातील २६ सिंचन प्रकल्पांची कामे सन २०१८ पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. यासाठी जलसंपदा विभागाच्या यंत्रणेने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आराखडा तयार केला आहे.
त्यादृष्टीने जलसंपदा विभागाने नियोजनसुद्धा ठरविले आहे. अनुशेषांतर्गत २६ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नवीन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देणे सुरू असलेल्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देणे, निधीचे पुनर्विनियोजन, भूसंपादन, पुनर्वसन वनविभागाची मंजुरी व रिक्त पदे भरणे अशा विविध प्रश्नांचे निराकरण करण्याचे आवाहन शासनासमोर आहे. रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेल्यास त्यापासून सिंचनाची सुविधा होऊन शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन घेण्यास हातभार लागू शकेल. (प्रतिनिधी)
प्रकल्पाचे काम संथगतीने
जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी प्रकल्पांना निधी देणे आवश्यक आहे. शिवाय यामधील काही सिंचन प्रकल्प केंद्र शासनाने नियंत्रणासाठी वळते करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील बऱ्याच सिंचन प्रकल्पाचे काम अपूर्ण आहे. त्यामध्ये ३३ प्रकल्प अनुशेषांतर्गत पूर्ण करावयाचे आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होत नसल्याने मात्र जिल्ह्याचा अनुशेष वाढत आहे.