ऊसाप्रमाणे सोयाबीन, कपाशीलाही राजाश्रय द्या- रविकांत तुपकर
By उज्वल भालेकर | Updated: October 26, 2023 19:07 IST2023-10-26T19:07:14+5:302023-10-26T19:07:34+5:30
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी १ नोव्हेंबरपासून निघणार एल्गार रथ यात्रा

ऊसाप्रमाणे सोयाबीन, कपाशीलाही राजाश्रय द्या- रविकांत तुपकर
उज्वल भालेकर, अमरावती: राज्यात ज्या प्रकारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राजाश्रय आहे, त्याप्रमाणे सोयाबीन, कपाशीचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही राजाश्रय मिळायला हवे. उसाच्या संदर्भात ज्या प्रकारे नेते आवाज उठवतात. त्याप्रमाणे सोयाबीन, कपाशीच्या प्रश्नावर एकही नेता आवाज उठवत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाही, हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. आज शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे सोयाबीन, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार महामोर्चा काढणार असल्याची माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
पावसाच्या खंडामुळे सोयाबीनवर यलो मोझॅकचा अटॅक, तर कपाशीवर बोंडअळी मुळे यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट आहे; परंतु यावर कोणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे १ नोव्हेंबरपासून शेगाव येथून गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन एल्गार रथ यात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे. २० नोव्हेंबरला ही रथ यात्रा बुलढाणा येथे पोहोचून या रथयात्रा एल्गार महामोर्चात त्याचे रूपांतर होणार असून विदर्भातील लाखोच्या संख्येने शेतकरी, शेतमजूर या मोर्चात सहभागी असणार असल्याची माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली. या महामोर्चातून पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपयांची मदत, सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजार, तर कपाशीला १२ हजार ५०० भाव, चालू वर्षाची पीक विम्याची अग्रीम व शंभर टक्के पीक विमा लाभ, विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती, वन्यप्राण्याच्या त्रासापासून शेतकऱ्यांना सिमेंटचे मजबूत कम्पाउंड, अशा विविध मागण्या करण्यात येणार आहे. या महामोर्चामध्ये पक्षांचे झेंडे बाजूला सारून शेतकरी सहभागी होणारा असल्याचेही तुपकर म्हणाले. यावेळी प्रशांत अढाऊ, कपिल पडघान, प्रशांत शिरभाते, दिनेश यावले, प्रीती साहू आदी उपस्थित होते.