दिव्याखालीच अंधार; वाहतूक कार्यालयाला अतिक्रमणाची घेराबंदी
By Admin | Updated: January 29, 2016 03:57 IST2016-01-29T03:57:25+5:302016-01-29T03:57:25+5:30
शहरातील वाहतूक निर्धोक आणि सुरळीत रहावी, वाहतुकीचे नियमन व्हावे, यासाठी वाहतूक शाखेकडे नियमनाची

दिव्याखालीच अंधार; वाहतूक कार्यालयाला अतिक्रमणाची घेराबंदी
अमरावती : शहरातील वाहतूक निर्धोक आणि सुरळीत रहावी, वाहतुकीचे नियमन व्हावे, यासाठी वाहतूक शाखेकडे नियमनाची जबाबदारी सोपविली आहे. अतिक्रमण काढण्याचे ‘अधिकार’ या शाखेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आहेत. तथापि शहरातील तर सोडाच कार्यालयाशेजारीच थाटलेल्या अतिक्रमणावर या शाखेला हातोडा टाकता आलेला नाही. त्यामुळे शहर वाहतूक शाखेसमोर व्यावसायिकांनी थाटलेले अतिक्रमण म्हणजे दिव्याखाली अंधार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
‘पीयूसी’चा बाजार
इर्विन चौकात शहर वाहतूक शाखेचे मुख्य कार्यालय आहे. सहायक पोलीस आयुक्तांसह दोन पोलीस निरीक्षक येथे असतात. या कार्यालयालगत एक पीयूसी व्हॅन सकाळपासून रात्रीपर्यंत ‘व्यवसाय’ करीत असते. त्या व्हॅनवर कुणाचाही निर्बंध नाही. या पीयूसी व्हॅन चालकाने थाटलेल्या अतिक्रमणावर अद्यापही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. शहर वाहतूक शाखेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना बहुतेक हे अतिक्रमण दिसत नसावे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
पानटपरीमुळे अपघात
शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाला लागून असलेली पानटपरी गेल्या अनेक वर्षांपासून ‘व्यवसाय’ करीत आहे. येथे पान, खर्रा आणि गुटखा खाण्यासाठी आलेल्या शौकीनांच्या वाहनांची १२-१४ तास अवैध पार्किंग असते. या पानटपरीजवळ अनेक चारचाकी वाहने थांबलेली असतात. येथे एकाही दुचाकीला दंड किंवा एखाद्या ‘जामर’ लावण्यात आले नाही. या पानटपरी चालकावर वाहतूक विभागाचा वरदहस्त असल्याच्या चर्चेला यामुळेच बळ मिळते. वाहतूक विभागाच्या मध्यवर्ती कार्यालयाला लागून अनेक दुचाकी अवैधपणे पार्क केलेल्या असतात. यात पोलिसांच्या दुचाकींचाही समावेश असतो. मग कारवाई कुणावर करायची, हा प्रश्न निर्माण होतो. या कार्यालयाशेजारी पानटपरी, पीयूसी वाहनासह अन्य अतिक्रमण असल्याने या मध्यवर्ती भागात अवैध पार्किंगने डोके वर काढले आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या या अतिक्रमणावर वाहतूक शाखा अंकुश लावेल का? याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
तीन शाखांमध्ये विभागणी
४ शहरातील वाहतूक नियमनाची जबाबदारी प्रमेश आत्राम, नीलिमा आरज आणि बळीराम डाखोरे या तीन पोलीस निरीक्षकांकडे आहे.
अतिक्रमणावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. कुठल्याही समस्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र त्यावर उपाययोजना सुद्धा कराव्या लागतील.
- नितीन पवार
पोलीस उपायुक्त, वाहतूक
स्थानिक इर्विन चौकातील वाहतूक शाखेच्या मध्यवर्ती कार्यालयाला अतिक्रमणाने अशी घेराबंदी केली आहे.