शुक्रवारपर्यंत मेघगर्जनेसह हलका पाऊस
By Admin | Updated: May 28, 2015 00:19 IST2015-05-28T00:19:10+5:302015-05-28T00:19:10+5:30
विदर्भात शुक्रवारपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शुक्रवारपर्यंत मेघगर्जनेसह हलका पाऊस
मान्सून १० जूननंतर : वाऱ्याचा वेग ताशी २० ते ३० कि.मी. राहण्याची शक्यता
ुुवैभव बाबरेकर अमरावती
विदर्भात शुक्रवारपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी २० ते ३० किलोमीटर राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सद्यस्थितीत मान्सून अंदमान समुद्र आणि श्रीलंकेजवळ थबकला आहे. त्यामुळे मान्सून विदर्भात १० जूननंतर पोहचण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
विदर्भात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली होती. मात्र, तीन दिवसांपासून तापमानात तुरळक प्रमाणात घटल्याचेही दिसून आले आहे. येत्या दोन दिवसात कमाल तापमानात २ डिग्री सेल्सीअसने कमी होऊन उष्णतेची लाट शांत होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिला. दिवसाचे तापमान ४२ ते ४३ डिग्री सेल्सीअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. उन्हाच्या प्रभावाने मोठ्या प्रमाणात धरणातील व तलावातील बाष्पीभवन होऊ शकते. येणारे दोन ते तीन दिवस मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल आहेत. मान्सून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दाखल होण्याची शक्यता आहे. केरळात मान्सूनचे आगमन १ जुनपर्यंत होण्याचे अपेक्षित असून मान्सूनचा प्रवास सुरळीत राहिल्यास १० जूनपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
आपत्ती निवारण विभागाकडून मार्गदर्शन
गेल्या काही वर्षात ढगफुटी, वादळ, अतिवृष्टी, पावसाचे मोठे खंड, गारपीटचे प्रमाण वाढले आहे. अशा अचानकपणे घडणाऱ्या घटना आणि त्याबाबतचा अंदाज हा अल्पकाळापुरता दिला जातो. त्यामुळे काही वेळसुध्दा दिला जात नाही. ढगफुटी ही लहान भागावर सहसा पर्वती व डोंगरी भागात होत असल्यामुळे अचानक धरण क्षेत्रात पाणी पुरवठा वाढतो.
जुलै महिन्यात अतिवृष्टीचे संकेत
शास्त्रज्ञ व संस्थाकडून मिळालेल्या माहितीनुसार जुन महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. त्यातच जुलै महिन्यात अतिवृष्टी होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे व नियोजन करण्याची आवश्यकता आहे, असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
येत्या दोन दिवसात उष्णतेची लाट शांत होईल, मान्सूनसाठी परिस्थिती अनुकुल असल्यास येत्या १ जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होऊ शकतो. मान्सूनचा प्रवास सुरळीत राहिल्यास १० जूननंतर विदर्भात पोहचण्याची शक्यता आहे. विदर्भात २९ मेपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
-अनिल बंड,हवामान तज्ज्ञ