मध्य प्रदेशातून वीज आणून मेळघाट प्रकाशमय करु
By Admin | Updated: November 6, 2014 00:47 IST2014-11-06T00:47:22+5:302014-11-06T00:47:22+5:30
मेळघाटातील कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासोबतच मध्यप्रदेशातून वीज आणून मेळघाटातील गावे प्रकाशमय करण्यासाठी...

मध्य प्रदेशातून वीज आणून मेळघाट प्रकाशमय करु
धारणी : मेळघाटातील कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासोबतच मध्यप्रदेशातून वीज आणून मेळघाटातील गावे प्रकाशमय करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे आयोजित कार्यक्रमात दिले. आदिवासींना सातबारा प्रमाणपत्राचे वाटप करताना ते बोलत होते.
स्थानिक उपविभागीय कार्यालयात आयोजित सातबारा प्रमाणपत्राच्या वाटप कार्यक्रमात त्यांनी आदिवासींसोबत मनमोकळेपणाने संवाद साधला. कार्यक्रमाला संबोधित करताना महामहिम राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले की, मेळघाटात कुपोषणामुळे होत असलेले बालमृत्यू हा चिंतेचा विषय असून येथील कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच पेसा कायद्याच्या तरतुदीची अंमलबजावणी व्हावी, मेळघाटातील आदिवासींना रोजगाराची संधी मिळावी, येथील आदिवासींचे रोजगाराच्या शोधात होणारे स्थलांतर थांबावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच अनूसूचित जातीच्या नोकरभरतीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, आ, प्रभुदास भिलावेकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी अनिल भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांची उपस्थिती होती. यावेळी राज्यपालांच्या हस्ते आदिवासी बांधवांना सातबारा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. सातबारा मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये हिरालाल शेरेकर, शामलाल बेठेकर, मन्सालाल मावस्कर, उत्तमसिंग बहेडीया, रतनभिलावे, भैय्या भाग, फुलसिंग बहेलीया, रतन भिलावेकर, भय्या दारसिंबे, भय्यालाल बाबुलाल, मोती केवलेकर, मुन्ना केवलेकर यांना सातबारा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.