हत्येप्रकरणी युवकाला जन्मठेप
By Admin | Updated: February 12, 2015 00:21 IST2015-02-12T00:21:03+5:302015-02-12T00:21:03+5:30
तळेगाव दशासर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जळका पटाचे येथील देवराव भाकरे नामक व्यक्तिच्या हत्येप्रकरणी स्थानिक जिल्हा व सत्र न्यायाधीश..

हत्येप्रकरणी युवकाला जन्मठेप
अमरावती : तळेगाव दशासर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जळका पटाचे येथील देवराव भाकरे नामक व्यक्तिच्या हत्येप्रकरणी स्थानिक जिल्हा व सत्र न्यायाधीश (४) एस.एम. भोसले यांनी आरोपी राजू पंधरे (२७) यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
विधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळकापट येथील निवासी देवराव भाकरे व राजू पंधरे यांचा बकरी पालनाचा व्यवसाय होता. घराजवळच देवराव यांचा खुला प्लॉट होता. येथे बकऱ्या बांधण्याची परवानगी राजूने मागितली होती. काही दिवस त्याने या खुल्या जागेवर बकऱ्या बांधल्या. त्यानंतर राजू ती रिकामी जागा खरेदी करण्यास इच्छूक होता. परंतु देवरावने जमीन विकण्यास नकार दिला.
यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर सहा महिन्यांनी १९ जुलै २०१२ रोजी राजू स्वत:ची स्कुट वाहन घेऊन दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान देवरावच्या घरी पोहोचला आणि आम्ही देवगाव फिरून येतो, असे मृत देवराव यांच्या पत्नीला सांगितले. ते दोघे स्कुटरवर बसून फिरविण्याच्या बहाण्याने देवगावकडे निगाले. मार्गात त्याला दिनेश जगदेवराव भांगे (२४) नामक व्यक्ती भेटली. त्यालाही राजूने स्कुटरवर बसवून नेले.
तिघांना स्कूटरवरून जाताना देवरावचा पुतण्या सचिन भाकरे व पुंडलिक वाकडे यांनी पाहिले होते. दरम्यान त्यांनी एका हॉटेलवर नाश्ताही केल्याचे जगदीश बुटले यांनी सांगितले.
दुपारी ३ वाजताच्या सुमारास मलातपूर येथील पोलीस पाटील सदाशिव तुमडाम महिमापूर मार्गावरील शेतात जात असताना त्यांना देवरावचे रक्ताने माखलेले प्रेत दिसून आले. त्यांनी लगेच तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. देवराव यांच्यावर चाकूने वार करण्यात आले होते. त्याच्या हातावर गोंदलेल्या नावावरून देवरावची ओळख पटली. २१ जुलै २०१२ रोजी मृताचा पुतण्या सचिन भाकरे याने राजू पंधरे व त्याचा सहकारी दिनेश भांगे विरूद्द तळेगाव पोलीस टाण्यात तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपींविरूध्द कलम ३०२, २०१ व ३४ नुसार गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली.
चौकशीनंतर सहायक निरीक्षक सुधाकर इंगळे यांनी १८ आॅक्टोबर २०१२ विरूध्द न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधिश (४)एस.एम.भोसले यांच्या न्यायालयात सुनावणी दरम्यान एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. यापैकी ४ फितूर झाले.
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी राजू पंधरे याला खुनाच्या गुन्हायात दोषी असल्याचे सांगून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
पुरावे नष्ट केल्याप्रकरणी २ हजार रूपये दंडही ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास दोन महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर दिनेश भांगे याची ठोस पुराव्यांअभावी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
सरकार पक्षाकडून सहायक सरकारी वकील प्रकाश शेळके यांनी प्रभावी युक्तिवाद केला. (प्रतिनिधी)