हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

By Admin | Updated: September 16, 2014 23:25 IST2014-09-16T23:25:09+5:302014-09-16T23:25:09+5:30

चांदूरबाजार तालुक्यात कारंजा (बहिरम) येथे पिता-पुत्राच्या भांडणात मध्यस्थी करण्यास गेलेल्या इसमाच्या डोक्यावर लोखंडी घन मारुन हत्या केल्याप्रकरणी आरोपीला अचलपूर येथील अतिरिक्त

Life imprisonment for murder | हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

कारंजा बहिरम येथील घटना : भांडणात मध्यस्थी करणाऱ्याची हत्या
अचलपूर : चांदूरबाजार तालुक्यात कारंजा (बहिरम) येथे पिता-पुत्राच्या भांडणात मध्यस्थी करण्यास गेलेल्या इसमाच्या डोक्यावर लोखंडी घन मारुन हत्या केल्याप्रकरणी आरोपीला अचलपूर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
कारंजा (बहिरम) येथील विनोद उर्फ दादू मोतीराम कास्देकर, असे न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या हत्येतील आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात न्यायालयात दाखल दोषारोपत्रानुसार, कारंजा (बहिरम) येथील आरोपी विनोद उर्फ दादू मोतीराम कास्देकर याचा ११ डिसेंबर २०१२ रोजी वडील मोतीराम कास्देकर यांच्यासोबत वाद सुरु होता. या वादात शेजारीच राहणाऱ्या ज्ञानेश्वर बळीराम सातपाने यांनी मध्यस्थी केली.
पिता-पुत्रामधील वाद संपुष्टात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु ज्ञानेश्वर सातपाने यांनी भांडणात केलेली मध्यस्थी केलेली आरोपी विनोद कास्देकर याला सहन झाली नाही.
त्याने ज्ञानेश्वर यांच्याशी भांडण करुन त्यांच्या डोक्यावर लोखंडी घनाने हल्ला चढविला. यात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर सातपाने यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी ज्ञानेश्वरचा भाऊ रमेश बळीराम सातपाने यांनी शिरजगाव कसबा पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली.
शिरजगावचे तपास अधिकारी आय. एस. पठाण यांनी याप्रकरणी तपास करुन हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी अचलपूरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. आर. आर. वैष्णव यांच्या न्यायालयात ठेवले.
न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकूण घेतली. पोलिसांचा तपास व सरकारी पक्षातर्फे साक्षीदारांच्या बयाणावरुन न्यायालयाने आरोपी विनोद कास्देकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
तसेच पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे शरद काळमेघ यांनी कामकाज पाहिले.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Life imprisonment for murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.