जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता पोहोचले जलशुद्धीकरण केंद्रावर
By Admin | Updated: June 28, 2015 00:37 IST2015-06-28T00:37:46+5:302015-06-28T00:37:46+5:30
शहरावासीयांना गढूळ पाण्याच्या पुरवठा होत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच महाराष्ट्र जीवन ..

जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता पोहोचले जलशुद्धीकरण केंद्रावर
अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना : पाणीपुरवठ्यात सुधारणा
अमरावती : शहरावासीयांना गढूळ पाण्याच्या पुरवठा होत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभिंयता प्रशांत भामरे शनिवारी सकाळी जलशुध्दीकरण केंद्रावर पोहोचले. त्यांनी स्वत: पाणी गढुळतेची तपासणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाणी शुध्दतेबाबत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पावसाच्या पाण्यामुळे सिभोंरा धरणाची जलपातळी वाढली असून विविध स्त्रोतातील पाणी धरणात ढवळले जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात शहरवासीयांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र, हे पाणी गढूळ नसून पांढुरका रंगाचे असल्याचे मत जीवन प्राधिकरणाचे आहे. सिभोंरा धरणाचे पाणी अमरावतीच्या जलशुध्दीकरण केंद्रावर शुध्द करुन नागरिकांना पुरवठा केला जात आहे. मात्र, तरीही पाण्यात गढूळता आढळून येत आहे. गढूळ पाणी नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. याबाबत लोकमतने शनिवारी वृत्त प्रकाशित करताच जीवन प्राधिकरणाने लक्ष वेधले आहे. स्वत: कार्यकारी अभिंयता प्रशांत भामरे यांनी सकाळीच जलशुध्दीकरण केंद्राला भेट देऊन पाण्याची गढुळता तपासणी केली आहे. साधारणत: पाण्यात एक पीपीएमपर्यंत गढूळता आढळल्यास ते पाणी पिण्यास योग्य असल्याचे जीवन प्राधिकरणाचे मत आहे. शनिवारी भामरे यांनी स्वत: पाणी तपासणी केली असता पाण्यात ०.४ पीपीएमचीच (टरबिरीटी) गढुळता आढळून आली. पाणी गढूळ नसून ते पांढुरक्या रंगाचे दिसणारे आहे आणि ते पाणी पिण्यास योग्य असल्याचे दावा जीवन प्राधिकरणाने केला आहे. प्राधिकरण अधिकाऱ्यांनी पाणी शुध्दतेची हमी नागरिकांना द्यावी, अशी अपेक्षा काही नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
पाण्याचे २० नमुने शासकीय प्रयोगशाळेत
जलशुद्धीकरण केंद्रावरील प्रयोग शाळेत दररोज पाणी तपासणी केली जाते. तसेच जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतही पाणी नमुन्याची तपासणी करण्यात येते. सद्यस्थितीत २० पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत.
पहिल्या पावसामुळे धरणातील पाणी ढवळले गेले आहे. त्यामुळे पाण्याला थोडा पांढुरका रंग आला आहे. तो रंग नाहिसा करणे शक्य नसून पाण्याची शुध्दता तपासूनच नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. पाण्यात तुरटीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. पाणी शुद्धतेची कार्यकारी अभियंत्यांनी जलशुध्दीकरण केंद्राला भेट देऊन तपासणी केली आहे.
- एस.एम.सांबापुरे,
शाखा अभियंता,
जलशुध्दीकरण केंद्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.