पशूंची मालकी सिद्ध करण्यासाठी परवाना अनिवार्य
By Admin | Updated: December 23, 2016 00:13 IST2016-12-23T00:13:46+5:302016-12-23T00:13:46+5:30
वारंवार ताकिद आणि नोटीस देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या पशुपालकांवर फौजदारी कारवाई करण्याचा सपाटाच महापालिकेने चालविला आहे.

पशूंची मालकी सिद्ध करण्यासाठी परवाना अनिवार्य
अमरावती : वारंवार ताकिद आणि नोटीस देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या पशुपालकांवर फौजदारी कारवाई करण्याचा सपाटाच महापालिकेने चालविला आहे. पशुंची मालकी सिद्ध करण्यासाठी आता परवाना अनिवार्य करण्यात आला आहे.
मोकाट जनावरांमुळे शहरातील अपघात वाढले असून वराहांच्या मुक्त संचारामुळे आरोग्यही धोक्यात आले आहे. यासाठी महापालिकेकडून पशुपालकांना वारंवार नोटीस आणि समज देण्यात आली. तरीही बहुतांश गाई, बैल आणि वराह रस्त्यावर मोकाट फिरताना आढळून येतात. महापालिकेचा पशुवैद्यकीय विभाग मोकाट जनावरांवर कारवाई करीत असला तरी त्याला सुद्धा मर्यादा आहेत. आठ महिन्यांत महापालिकेने ९०० पेक्षा अधिक मोकाट जनावरांना बंदिस्त केले, तर त्यांना मालकांकडून साडेतीन लाखांचा दंडही वसूल केला. या कारवाईचा परिणाम संबंधित पशुधारकांवर पाहिजे तसा न झाल्याने महापालिकेने आता थेट फौजदारीचा मार्ग निवडला आहे.
शहरातील सर्व गोपालकांसह वराह आणि श्वानासह अन्य पशुपालकांनी त्यांच्याकडे असणाऱ्या पशू, जनावरांची महापालिकेत नोंदणी करावी, पशुची योग्य ती काळजी न घेता त्यांना मोकाट सोडणे, त्याचा निवारा आणि चारा पाण्याची व्यवस्था न करणे ही क्रुरता असून त्यामुळेच अशांवर फौजदारीची कारवाई केली जाणार आहे. मोकाट जनावरे पकडण्यासाठी असलेल्या पथकासोबतच अनेक पशुपालक मुजोरी करतात. वेळप्रसंगी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या भरारी पथकाने मोकाट पशुंना जप्त केल्यानंतर ज्या कोणत्याही पशुधारकास स्वत:च्या मालकीचा पशु सोडवायचा असल्यास त्यांना त्यांच्या पशुंचा मालकीहक्क सिद्ध करावा लागेल. पशुंची मालकी सिद्ध करण्यासाठी जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी किंवा महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचा नोंदणी केल्याचा दाखला अनिवार्य असेल.
अन्यथा पशुपालकांवर फौजदारी गुन्हा
असे आहे परवाना शुल्क
बैल, वळू, गाय, म्हैस, घोडा या जनावरांची कमाल मर्यादा पाच जनावरांना २५० रुपये, मेंढी, शेळी, वराह या जनावरांची कमाल मर्यादा १० प्रमाणे २५० रुपये, दोन श्वानांच्या परवान्यासाठी २५० रुपये, कमाल मर्यादेपेक्षा अधिक जनावरे असल्यास बैल, वळू, गाय, म्हैस या जनावरांसाठी प्रति जनावर ५० रुपये, शेळी, मेंढी, वराहांसाठी २५ रुपये प्रति जनावर तथा श्वानांसाठी प्रति श्वान १२५ रुपये असे वार्षिक परवाना वजा नोंदणी शुल्क आहे.