अनुदानासाठी जिल्हा ग्रंथालय संघाचा एल्गार
By Admin | Updated: November 15, 2014 22:40 IST2014-11-15T22:40:18+5:302014-11-15T22:40:18+5:30
राज्य शासनाने जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. मात्र, कोषागार कार्यालयाने अनुदान वितरणात आडकाठी आणल्यामुळे ग्रंथालयांची अडचण झाली आहे.

अनुदानासाठी जिल्हा ग्रंथालय संघाचा एल्गार
अमरावती : राज्य शासनाने जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. मात्र, कोषागार कार्यालयाने अनुदान वितरणात आडकाठी आणल्यामुळे ग्रंथालयांची अडचण झाली आहे. त्यामुळे रखडलेले अनुदान त्वरित देण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी जिल्हाभरातील ग्रंथालयचालकांनी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन केले .
जिल्ह्यातील ग्रंथालय आणि वाचनालयांना शासनामार्फत दिले जाणारे अनुदान अद्यापपर्यंत मिळाले नव्हते. अनुदानासाठी गं्रथालय चालक व संबधित विभागाने सतत पाठपुरावा केल्यानंतर शासनाने अनुदान उपलब्ध करून दिले. उपलब्ध अनुदानाची रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात गेल्या तीन महिन्यांपासून पडून आहेत. हे अनुदान संबंधित ग्रंथालय चालकांना हमीपत्रावर देण्यात यावे, असे पत्र संचालकांनी दिले. परंतु अनुदान न मिळाल्याने तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. याशिवाय ग्रंथालयाचे प्रशासकीय कामकाज ठप्प पडले आहे. अनुदानासाठी सतत प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतरही दखल न घेतल्याने रखडलेले अनुदान त्वरित देण्यात यावे, यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन सादर करून अनुदानाचा तिढा सोडविण्याची मागणी केली. आंदोलनात जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुरेश देशमुख, उपाध्यक्ष प्रदीप चौधरी, कार्यवाहक राम देशपांडे, गणेश मानकर, प्रमोद गिरनाळे, संजय धर्माळे, चंद्रशेखर तरारे, नंदकिशोर ओलिवकर, चरणदास यावतकर, अमित निकम, दादाराव कडू, जुनेद पटेल, गजानन घेवारे, श्रीकृष्ण भातकुलकर, मनोज वाघमारे आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)