चांदूर बाजार तालुक्यातील वाचनालये कागदावरच सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:12 IST2021-07-28T04:12:56+5:302021-07-28T04:12:56+5:30
नागरिकांमध्ये वाचण्याची आवड निर्माण व्हावी, याकरिता शासनाने सार्वजनिक वाचनालयांची निर्मिती केली. याकरिता शासनातर्फे दरवर्षी लाखो रुपये अनुदान स्वरूपात प्रत्येक ...

चांदूर बाजार तालुक्यातील वाचनालये कागदावरच सुरू
नागरिकांमध्ये वाचण्याची आवड निर्माण व्हावी, याकरिता शासनाने सार्वजनिक वाचनालयांची निर्मिती केली. याकरिता शासनातर्फे दरवर्षी लाखो रुपये अनुदान स्वरूपात प्रत्येक वाचनालयाला देण्यात येतात. निरनिराळ्या विषयांवरील पुस्तके तसेच वृत्तपत्र वाचनालयाच्या माध्यमातून सर्वसाधारण लोकांना वाचता यावे, याकरिता शासनाने ग्रामीण भागात सार्वजनिक वाचनालये सुरू केली. याकरिता लागणारी पुस्तके व मनुष्यबळाचा खर्चसुद्धा शासनातर्फे करण्यात येतो. सुप्रसिद्ध साहित्यिक, रंजक कथा, स्पर्धा परीक्षा, आत्मनिर्भर बनण्याची कथा तसेच वर्तमानपत्र प्रत्येक वाचनालयात असणे आवश्यक आहे. अशा पुस्तकांच्या वाचनातून नवीन पिढी ही उच्चपदस्थ आरूढ होऊन तसेच देशाभिमानी कार्य बीज मनात रुजू शकते. मात्र, अनेक वाचनालय हे अनुदान लुटण्याचे माध्यम बनले असल्याचे दिसून येत आहे. काही वाचनालये दैनिक वृत्तपत्रदेखील खरेदी करत नाही. मात्र, या वृत्तपत्राचे बिले जोडून अनुदान लाटण्याचे काम काही वाचनालयातर्फे सुरू आहे.
तालुक्यात एकूण ३६ सार्वजनिक वाचनालय असून, यात ‘अ’ दर्जाचे एक वाचनालय, ‘ब’ दर्जाचे सात, ‘क’ दर्जाचे १६ वाचनालय, तर ‘ड’ दर्जाचे १२ वाचनालय आहे. मात्र, काही वाचनालय केवळ कागदोपत्री सुरू असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. याकडे संबंधित विभागाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतर्फे केला जात आहे. वाचनालय प्रशासनातर्फे नागरिकांना वर्तमानपत्रे तसेच स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे.
-----------------------
पोलिसांचा उपक्रम यशस्वी
एकीकडे शासन अनुदानावरील सार्वजनिक वाचनालये नागरिकांना सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरत आहेत. दुसरीकडे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक श्रीहरी बालाजी एन. यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील पोलीस ठाण्यात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. याकरिता शासनाकडून कोणताही निधी घेण्यात आला नसून, लोकसहभागातून या अभ्यासिका उभारण्यात आले आहेत.