शिक्षक महासंघाचे सरन्यायाधिशांना पत्र
By Admin | Updated: November 29, 2015 00:58 IST2015-11-29T00:58:33+5:302015-11-29T00:58:33+5:30
मेळघाटातील तरूण मुख्याध्यापक विजय नकाशे यांनी पंचायतराज समितीच्या धमकीमुळे आत्महत्या केल्याप्रकरणी योग्य कारवाईच्या मागणीसाठी शिक्षक महासंघाचे शेखर भोयर यांनी....

शिक्षक महासंघाचे सरन्यायाधिशांना पत्र
शेखर भोयर : दखल घेण्याची मागणी
अमरावती : मेळघाटातील तरूण मुख्याध्यापक विजय नकाशे यांनी पंचायतराज समितीच्या धमकीमुळे आत्महत्या केल्याप्रकरणी योग्य कारवाईच्या मागणीसाठी शिक्षक महासंघाचे शेखर भोयर यांनी भारताच्या सरन्यायाधिशांना पत्र लिहून लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
सेमाडोह या दुर्गम खेड्यातील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले नकाशे हे सरळमार्गी आणि भ्रष्टाचाराशी संबंध न ठेवणारे शिक्षक म्हणून परिसरात परिचित होते. त्यांनी गैरकारभार केल्याच्या ना तक्रारी आहेत, ना चर्चा. नकाशे प्रामाणिकपणे शिक्षणकार्य करीत असताना कुठल्याशा मुद्यावर पंचायतराज समितीने त्यांना धमकावले आणि त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांचा आहे. सासरे दादाराव वानखेडे यांनी चार आमदार आणि पाच अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रारही नोंदविली. पैकी केवळ उपशिक्षणाधिकारी पंडित पंडागळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पंचायतराज समितीचे सदस्य भरत गोगावले, विकास कुंभारे, समीर कुणावार आणि भाऊसाहेब फुंडकर यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले नाहीत. तक्रारकर्त्यांचे समाधान होईल, अशी प्रगतीही नाही. न्याय आणि कायद्याचा अंमल करणारी यंत्रणा सर्वांसाठीच सारखी असताना याप्रकरणी मात्र सत्तापक्षाचे आहेत म्हणून की काय, पण लोकप्रतिधींसाठी कायदा शिथिल झाल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. ही छबी सुधारण्यासाठी आणि नकाशे कुटुंबीयांच्या न्यायासाठी आपण या प्रकरणाची नोंद घ्यावी, अशी विनंती या पत्रातून भोयर यांनी केली आहे.