गुडेवारांना सीईओ करा, राणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By Admin | Updated: May 19, 2016 00:04 IST2016-05-19T00:04:58+5:302016-05-19T00:04:58+5:30
महानगरपालिकेचे नुकतेच बदलून गेलेले लोकप्रिय आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारीपदी नियुक्त करण्यात यावे,

गुडेवारांना सीईओ करा, राणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मागणी : जनतेला दिलासा द्या
अमरावती : महानगरपालिकेचे नुकतेच बदलून गेलेले लोकप्रिय आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारीपदी नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र बडनेऱ्याचे आमदार रवि राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.
गुडेवार यांनी वर्षभरात महापालिकेला आणि शहराला दखलनीय शिस्त लावली. सामान्यांचे महत्त्व महापालिकेत गुडेवारांच्या कारकिर्दीत वाढले होते. अमरावतीकरांची स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महापालिकेत खऱ्या अर्थाने अमरावतीकरांचे राज्य निर्माण झाले होते. सामान्यजनांसाठी थेट आयुक्तांचे दालन कायमस्वरुपी उघडे होते. आयुक्तांचा मोबाईल क्रमांक नागरिकांकडे उपलब्ध होता. भ्रष्टाचार निखंदून काढणारे कर्तव्य बजावण्याला महत्त्व देणारे गुडेवार स्थानांतरित झाल्यानंतर अमरावतीकरांनी आंदोलन उभारले होते. व्हॉट्स अॅप, फेसबुकवर आश्चर्यकारक जनसमर्थन गुडेवारांना लाभले होते. या तमाम मुद्यांचा आधार घेऊन आमदार रवि राणा यांनी गुडेवार यांच्या प्रशासन कौशल्याचे कौतुक केले आहे. अमरावती जिल्हा परिषदेत गुडेवारांसारखा अधिकारी आल्यास शिस्त लागेल. ग्रामीण जनतेला मोठा दिलासा मिळेल. निधीचा विनियोग पारदर्शकरित्या होईल. अमरावती जिल्हा परिषदेची ही गरज असून गुडेवार यांना तत्काळ प्रभावाने मुख्यकार्यपालन अधिकारी नेमावे, अशी प्रभावी मागणी राणा यांनी पत्रातून केली आहे.