आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण सेतूव्दारे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:13 IST2021-05-27T04:13:40+5:302021-05-27T04:13:40+5:30
अमरावती : कोरोना विषाणूचा वाढत चालेला प्रादुर्भाव लक्षात घेता, चालू शैक्षणिक सत्राबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. अशा स्थितीत ...

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण सेतूव्दारे धडे
अमरावती : कोरोना विषाणूचा वाढत चालेला प्रादुर्भाव लक्षात घेता, चालू शैक्षणिक सत्राबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. अशा स्थितीत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी गावस्तरावर जाऊन त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणे, यासह शिकवणी वर्गाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण सेतू अभियान राबविण्याचे निर्देश आदिवासी विकास विभागाने २४ मे रोजी जारी केले आहेत.
संसर्गजन्य कोरोना विषाणूमुळे मागील वर्षभरापासून शिक्षणांचा खेळखंडोबा झाला आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय सुरू केला असता दुर्गम, अतिदुर्गम व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना मोबाईल कनेक्टिव्हिटी अभावी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, अशा परिस्थितीत शासकीय आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. बहुतांश विद्यार्थी त्याच्या गावी परत गेले आहेत. कोरोना विषाणूचा हाहाकार लक्षात घेता, चालू शैक्षणिक सत्रावरही संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये या उद्देशातून राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण सेतू अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणे, ती होत नसल्यास गावस्तरावर जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणे तसेच त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणे यासह त्याच्या खात्यात डीबीटीनुसार पैसे जमा करण्याचाही समावेश करण्यात आला आहे.
बॉक्स
शासनाचा वॉच
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असेपर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण सेतू अभियान राबविण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा व शालेय पोषण आहाराचा पुरवठा केला जातो किंवा नाही यावर शासनाचा वॉच राहणार आहे.