अनुदानित सौर कृषिपंप योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ
By Admin | Updated: October 1, 2015 00:22 IST2015-10-01T00:22:19+5:302015-10-01T00:22:19+5:30
शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी तब्बल ९५ टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सौर कृषिपंप दिले जात आहेत.

अनुदानित सौर कृषिपंप योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ
शेतकऱ्यांमध्ये भीती : जनजागृती होणे अत्यंत गरजेचे
लोकमत विशेष
अमरावती : शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी तब्बल ९५ टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सौर कृषिपंप दिले जात आहेत. मात्र या चांगल्या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र उघड झाले आहे. एकदा सौर कृषिपंप घेतल्यास महावितरणकडून विजेवर चालणाऱ्या पंपासाठी जोडणी मिळणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे सौर कृषिपंप योजनेमधून सौर कृषिपंप घेण्यासाठी शेतकरी पुढे येत नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. जिल्ह्याला या योजनेंतर्गत १७०० शेतकऱ्यांना सौर कृषिपंप वितरणाचे लक्ष्य देण्यात आले असून सप्टेंबर अखेरपर्यंत केवळ ७१ शेतकऱ्यांचे अर्ज महावितरणकडे प्राप्त झाले आहेत.
विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. उल्लेखनीय म्हणजे शेतकरी लाभार्थ्यांना सौरपंपाच्या एकूण किंमतीमधील ५ टक्के हिस्सा द्यावा लागणार आहे. सौर ऊर्जेवरील कृषिपंपामुळे भारनियमन कमी दाब किंवा पुरवठा वारंवार खंडित होण्याच्या अडचणींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागणार नाही.
एकूण किमतीच्या पाच टक्के रकमेत सौर ऊर्जेवरील कृषिपंप मिळणार आहेत. त्याचे दरमहा किंवा वार्षिक कोणतेही देयके येणार नाही. ५ एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसोबत ज्या गावात पारंपरिक विद्युतीकरण झालेले नाही, त्या गावातील शेतकरी सुद्धा या योजनेस पात्र ठरणार आहेत. त्यामुळे ही योजना सामान्यांना लाभदायी आहे. (प्रतिनिधी)
या अटीमुळे झाला घोळ
सौर कृषिपंप घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी यापूर्वी शेतात वीज जोडणी घेतलेली नसावी. जर त्यांनी वीज जोडणी घेतली असेल तर त्यांना सौर कृषिपंप घेता येणार नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांना सौर कृषिपंप दिले जाणार आहेत त्यांना महावितरणकडून वीज जोडणी मिळणार नाही, अशी अट महावितरणने घातली आहे. नेमक्या याच अटीमुळे शेतकरी या योजनेत सहभागी होण्यास धजावत नाहीत.
सौर ऊर्जेवरील कृषिपंप बंद पडल्यास अपेक्षित कार्यान्वयन न झाल्यास आपली परिस्थिती ‘इकडे आड-तिकडे विहीर’ अशी होईल. सौर कृषिपंप बंद पडेल व त्यानंतर महावितरणकडून वीज जोडणीसुद्धा मिळणार नाही, या भीतीने शेतकऱ्यांना ग्रासले आहे आणि त्यामुळेच मार्च २०१५ पासून सुरू झालेल्या या योजनेला शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. ३ लाख २४ हजार रूपये किमतीच्या ३ एचपी सौर कृषिपंपासाठी शेतकऱ्यांना १६,२०० रूपये, ३ एचपी डीसी पंपासाठी २०,२५० रूपये भरावे लागणार आहेत.
संबंधित एजंसीला आम्ही सौर कृषिपंप लावतेवेळी फक्त ८० टक्के रक्कम देणार आहोत. शेतकऱ्यांकडून आलेल्या अनुभवानंतर उर्वरित रक्कम त्या एजंसीला देण्यात येईल. सौर कृषिपंप बंद पडणार नाहीत. शेतकऱ्यांनी कुठलीही भीती बाळगू नये.
- निलिमा गावंडे,
उपअभियंता, महावितरण, अमरावती.