पाच लाख मतदारांची राष्ट्रीय कर्तव्याकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 00:12 IST2017-02-23T00:12:28+5:302017-02-23T00:12:28+5:30
जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीच्या ८८ गणांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील ...

पाच लाख मतदारांची राष्ट्रीय कर्तव्याकडे पाठ
अनास्था : पाच वर्षांत ६० हजार मतदार वाढूनही यंदा टक्का ‘जैसे थे’
अमरावती : जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीच्या ८८ गणांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील १३ लाख ९० हजार ९०२ मतदारांपैकी ९ लाख ६६ हजार ५४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र, चार लाख ८४ हजार ३६१ मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्याकडे पाठ फिरविल्याचे अंतिम आकडेवारीनंतर स्पष्ट झाले. यापूर्वी २०१२ च्या निवडणुकी इतकी ही मतांची टक्केवारी आहे.
यापूर्वी ७ नोव्हेंबर २०१२ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत १३ लाख ३२ हजार १९८ मतदारांपैकी आठ लाख ६६ हजार ५२३ मतदारांनी मतदान केले होते. यामध्ये तीन लाख ९४ हजार ७८९ पुरुष व चार लाख ७१ हजार ७३४ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ही ६५.०४ टक्केवारी होती. यावेळेस ५८ हजार ७०४ मतदार वाढले व चार नगरपंचायतींचे किमान ४० हजार मतदान कमी झाले, असे एकूण १३ लाख ९० हजार ९०२ मतदार होते. यापैकी चार लाख ८९ हजार २८८ पुरुष व चार लाख १७ हजार २५० स्त्री असे एकूण नऊ लाख सहा हजार ५४१ स्त्री मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीत दोन लाख ३६ हजार पुरुष व दोन लाख ४८ हजार २ असे एकूण चार लाख ८४ हजार ३६१ मतदारांनी मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. सकाळच्या पहिल्या दोन तासात केवळ ८७ हजार ९८७ मतदारांनी मतदान केले. त्यानंतर मात्र मतदानाचा टक्का थोडा वाढला. दुपारी दीड पर्यंत चार लाख ६७ हजार ८३७ व साडेतीन पर्यंत सहा लाख ७० हजार १६३ व अंतिम क्षणापर्यंत म्हणजेच सायंकाळी साडेपाच पर्यंत एकूण नऊ लाख ६५ हजार ५४१ मतदारांनी मतदान केले.
दोन लाख ३६ हजार पुरुष मतदारांचा अनुत्साह
जिल्ह्यात पुरुष मतदारांचा टक्का अधिक आहे. या निवडणुकीत ७ लाख २५ हजार ६३० पुरुष मतदार होते. यापैकी ४ लाख ८९ हजार २८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर २ लाख ३६ हजार ३४२ मतदारांनी मतदान करणे टाळले. प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित असल्याने मतदानाचा टक्का यापूर्वीच निवडणुकीपेक्षा अधिक राहील, अशी अपेक्षा होती. कमी मतदानाचा कुणाला धक्का बसणार, हे गुरूवारी स्पष्ट होईल.
अडीच लाख स्त्री मतदारांनी टाळले मतदान
या निवडणुकीत दोन लाख ३६ हजार ३४२ पुरुषांनी मतदान करणे टाळले. त्या तुलनेत स्त्री मतदार अधिक माघारले आहे. यावेळी चार लाख १७ हजार २५० स्त्री मतदारांपैकी दोन लाख ४८ हजार २ स्त्री मतदारांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्याकडे पाठ फिरविली आहे. दिवसाचा पारा ३९ अंशावर, प्रचाराला केवळ ६ दिवसाचा अवधी व तूर, हरभऱ्याचा हंगामामुळे ग्रामीण भागात स्त्री मतदारांनी अनुत्साह दाखविल्याचे दिसून येते. महिलांचा टक्का वाढावा, यासाठी प्रशासनाद्वारा अधिक जनजागृतीची गरज आहे.
चार नगरपंचायतींचे ४० हजार मतदार कमी
जिल्ह्यात मागील वर्षी तिवसा, धारणी, नांदगाव खंडेश्वर व भातकुली या तालुक्याच्या मुख्यालयी नगरपंचायती स्थापित झाल्या व हे क्षेत्र नागरी झाल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वगळण्यात आले. त्यामुळे या वेळेच्या निवडणुकीत किमान ४० हजार मतदार कमी झाले. जिल्ह्यात पाच वर्षात ५८ हजार युवा मतदार वाढले असले तरी ४० हजार मतदान कमी झाल्याने अपेक्षित मतदान टक्केवारीचा टक्का माघारला.
यंदाही भातकुली तालुका टक्केवारीत माघारला
यंदाच्या निवडणुकीत चांदूरबाजार तालुक्यात ६८.०९ टक्के मतदान झाले. टक्केवारी हा तालुका अव्वल आहे. मात्र भातकुली तालुका शेवटच्यास्थानी राहीला. या तालुक्यात फक्त ५८.४९ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या निवडणुकीत देखील हा तालुका शेवटच्या स्थानी होता. त्यावेळी ५९.०८ टक्के मतदान झाले होते.