बिबट अद्यापही विद्यापीठातच दडून
By Admin | Updated: July 14, 2015 00:56 IST2015-07-14T00:56:29+5:302015-07-14T00:56:29+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात वारंवार बिबट दृष्टीस पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण

बिबट अद्यापही विद्यापीठातच दडून
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात वारंवार बिबट दृष्टीस पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सलग तीन दिवस बिबट्या आढळून आल्याने तो विद्यापीठ परिसरातच दडून बसल्याची चर्चा असून विद्यापीठ परिसरात वाढलेली झुडपी कापून स्वच्छता ठेवण्याच्या सूचना वनविभागाने दिल्या आहे. परिसरात वनकर्मचाऱ्यांनी गस्तदेखील वाढविली आहे.
विद्यापीठ परिसरलगतच वडाळी वनपरिक्षेत्राचे जंगल आहे. तेथील वन्यप्राणी विद्यापीठात येत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने परिसराच्या चौफेर संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरु केले. मात्र, अद्यापपर्यंत हे बांधकाम पूर्ण झाले नसून १० ते २० फुटांचा भिंतीचा भाग अद्यापही खुला आहे. या खुल्या भागातून बिबट्याने विद्यापीठ परिसरात प्रवेश केल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर भिंतीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाला दिल्या आहेत.
विद्यापीठात 'बिबट्यापासून सावधान'चे फलक
विद्यापीठ प्रशासनाने बिबट्यापासून सावध राहण्याच्या सूचना विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. प्रवेशद्वारासमोरच ‘सावधान’चा फलक लावण्यात आला आहे. प्रवेशद्वारासमोर लावलेले फलक पाहून विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.