निंभोरा परिसरात बिबट्याचा वावर
By Admin | Updated: July 6, 2017 00:22 IST2017-07-06T00:22:50+5:302017-07-06T00:22:50+5:30
येथील जुन्या बायपास जवळील निंभोरा परिसरात पुन्हा बिबटाचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

निंभोरा परिसरात बिबट्याचा वावर
नागरिक भयभीत : अपघातात मादी बिबट्याचा अंत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: येथील जुन्या बायपास जवळील निंभोरा परिसरात पुन्हा बिबटाचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. रविवारच्या मध्यरात्री या परिसरात कर्मचाऱ्यांना बिबट दिसून आला होता. काही दिवसापूर्वी येथे मादी बिबटने हैदोस घातला होता. पण आठवडाभरापुर्वीच तिचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे.
या परिसरात अनंत टाले व इतर नागरिकांची जुना बायपास मार्ग ते एमआयडीसी निंभोरा परिसरात बांधकाम सुरू आहे. येथे १० ते १२ दिवसापूर्वी एक मादी बिबट दोन ते तीन दिवस सतत या ठिकाणी आली होती. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मजुरांना राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या झोपडीच्या दरवाजाचे टिनाच्या पत्र्याला या मादी बिबट्याने पंजे मारले होते. बिबट्याच्या पायाचे ठसे सुध्दा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले होते. येथून चार- ते पाच दिवसात त्या मादी बिबट्याचा एक्सप्रेस हायवेवर अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यानंतर वडाळी आरएफओंनी बिबट्याचे विच्छेदन करून अंत्यसंस्कार केला. त्यानंतर काही दिवस परिसरात बिबट नागरिकांना दिसला नाही. पण तिचा सोबती आता नर बिबट पाण्याच्या शोधात पुन्हा याच परिसरात वावर करतो आहे. तो मादी बिबटचा सोबती असावा, असा अंदाज वनकर्मचारी, नागरिकांनी बांधला आहे. हा बिबट रविवारच्या रात्री आढळून आल्यानंतर याबाबतची माहिती नागरिकांना वरीष्ठ वनािधकाऱ्यांना दिली. परंतु त्याला जेरबंद करता येत नाही. नागरिकांनी जिवीताची काळजी स्वत: घ्यावी, असे विभागीय वनाधिकारी पंचभाई यांनी सांगितल्याने संताप व्यक्त होत आहे.
वनविभाग परिसरात वाढविणार गस्त
वडाळी वनपरिक्षेत्राअंतर्गातील जंगलातून पाण्याच्या शोधात अनेक बिबट शहराकडे येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात बिबट्याचा सतत वावर वाढत असल्याचे आम्हाला कळले आहे. त्यामुळे रात्री वनकर्मचाऱ्यांना गस्तीवर पाठविण्यात येईल, असे वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
छावा बिबट दिसला
वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी एच. पी. पडगव्हाणकर हे स्वत: गस्तीवर असताना त्यांना वडाळी वनक्षेत्र १२ मध्ये छावा बिबट आढळून आला आहे. मादी बिबट सुपर एक्सप्रेस हायवेवर रस्ता अपघातात मृत्यू झाल्याने तिचाच हा छावा असावा असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. आईचे मातृत्व हरवले गेल्याने तो छावा बिबट एकटाच भटकंती करीत आहे. त्यामुळे मोठ्या बिबट्यापासून त्याच्याही जिवीताला धोका असल्याचे वनािधकाऱ्यांचे म्हणणे आहे.
निंभोरा परिसरात वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात येणार आहे. वडाळी परिसरात ३० जून रोजी लहान बछडा बिबट आम्हाला दिसून आला होता. आता आणखीन बिबट आढळल्याने बुधवारी या परिसरात वनविभागाचे वाहन पाठविण्यात येणार आहे.
- एच. पी. पडगव्हाणकर
वनपरिक्षेत्र अधिकारी वडाळी
या परिसरात आधी मादी बिबट येत होते तिचा मृत्यू झाल्यानंतर दुसरा एक बिबट येत आहे. त्यामुळे कामावरील मजुरांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने त्याचा बंदोबस्त करावा.
- अनंत टाले, नागरिक