लिंबू उत्पादक शेतकरी संकटात ; बाजारपेठच नाही, दर घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 19:30 IST2020-04-16T19:30:26+5:302020-04-16T19:30:57+5:30
मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत लिंबाला चांगली मागणी असते व भावही मिळतो. पण, लॉकडाऊनमध्ये बाजारपेठेत मालाला उठावच नसल्याने तो कसा व कोठे विकावा, ही समस्या शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे.

लिंबू उत्पादक शेतकरी संकटात ; बाजारपेठच नाही, दर घसरले
संजय जेवडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: लिंबू बागेत फळे तयार झाली आहेत. पण, बाजारपेठेत त्याला मागणीच नसल्याने अद्यापही शेतकऱ्यांकडून लिंबूची तोड सुरू झाली नाही. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत लिंबाला चांगली मागणी असते व भावही मिळतो. पण, लॉकडाऊनमध्ये बाजारपेठेत मालाला उठावच नसल्याने तो कसा व कोठे विकावा, ही समस्या शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १३० हेक्टरवर लिंबाच्या बागा आहेत. माहुली चोर, मंगरूळ चव्हाळा, पिंपरी, धानोरा गुरव, पहूर, पापळ, जामगाव, नांदसावंगी, शेलुगुंड, येणस, कणी मिझार्पूर व आणखी काही गावांतही शेतकरी लिंबाचे उत्पादन घेतात.
उन्हाळ्याच्या हंगामात लिंबूला किलोला ५० ते ६० रुपये भाव मिळतो. पण, मंगळवारी अमरावती बाजारात फक्त १५ ते २० रुपये भाव मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. रसवंती, रेस्टॉरंट, हॉटेल, लिंबू प्रक्रिया कारखाने लॉकडाऊनमुळे बंद आहेत. बाजारपेठेत ग्राहकही कमी झाले आहेत. आता फक्त मे महिना व एप्रिलचे काही दिवस माल विक्रीसाठी उरले आहेत. उन्हाळ्याच्या हंगामातही लिंबाला मागणी नसल्याने लिंबू उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
बागेतील लिंबूचा माल तोडीसाठी तयार झाला आहे. पण, बाजारपेठेची अडचण असल्याने मालक कुठे विकावा, ही समस्या आहे.
- अंकुश झंझाट, लिंबू उत्पादक, माहुली चोर
गावात लिंबूच्या फळबागा आहे. फळांचा माल तयार आहे. पण, बाजारपेठेची अडचण आहे. तो माल कसा विकावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
- विकास सरोदे, लिंबू उत्पादक, माहुली चोर
शासनाने कृषिमालाची ने-आण करण्याची परवानगी दिली आहे. पण, बाजारपेठेत ग्राहक नसल्याने लिंबूला उठाव नाही. मे महिन्यात भाव वधारण्याची शक्यता आहे.
- राहुल माने, तालुका कृषी अधिकारी, नांदगाव खंडेश्वर