वनविभागातील बदल्यांचा घोळ पोहोचला विधिमंडळात

By Admin | Updated: July 13, 2015 00:35 IST2015-07-13T00:35:11+5:302015-07-13T00:35:11+5:30

राज्य शासनाने वनविभागात बदल्यांमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार विभागस्तरावर दिले आहे.

In the legislative assembly, there was a rift in the forests | वनविभागातील बदल्यांचा घोळ पोहोचला विधिमंडळात

वनविभागातील बदल्यांचा घोळ पोहोचला विधिमंडळात

लक्षवेधी : वीरेंद्र जगताप विचारणार शासनाला जाब
अमरावती : राज्य शासनाने वनविभागात बदल्यांमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार विभागस्तरावर दिले आहे. मात्र, अमरावती वनवृत्त स्तरावर नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याच्या पार्श्वभूमीवर आ.वीरेंद्र जगताप यांनी येत्या अधिवेशनात लक्षेवधी दाखल करुन वनविभागाचा कारभार चव्हाट्यावर आणण्याची रणनीती आखली आहे. या बदल्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप पदोन्नत वनपाल संघटनेने यापूर्वीच केला आहे, हे विशेष.
वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नियमसंगत बदल्या करताना यापूर्वी दरवर्षी मंत्रालयात वनविभागात बदल्यांचा बाजार भरायचा. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील शासनाने वनविभागात चालणाऱ्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांना बदली करण्याचे अधिकार बहाल केले आहे. स्थानिक वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कर्तव्याची जाणीव त्या परिसरातील वनाधिकाऱ्यांना राहत असल्याने बदली प्रक्रिया राबविताना उत्कृष्ट आणि कर्तव्यशील कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये, ही बदली मागील शासन काळातील आहे. परंतु अमरावती येथील मुख्य वनसंरक्षक कार्यायलाने विभागीय स्तरावर वनपरिक्षेत्र अधिकारी, पदोन्नत वनपाल, सरळ सेवेतील वनपालांच्या बदल्या करताना काहींच्या सेवेची तीन वर्षे पूर्ण झाली नाही तरीही त्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा प्रताप केला आहे. नेमकी हीच बाब आ. वीरेंद्र जगताप यांनी हेरली असून सेवेचा कार्यकाळ संपला नसताना संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदल्या कशा करण्यात आल्यात, हा सवाल त्यांनी लक्षवेधीमध्ये नमूद केला आहे. काही मर्जीतील वनपाल, वनरक्षकांना मलईदार जागेवर नियुक्ती करण्याची खेळी वन अधिकाऱ्यांनी केल्याचे पुरावे आ. जगताप यांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे अधिवेशनात ही लक्षेवधी प्राधान्याने घ्यावी, अशी विनंती विधानसभा अध्यक्षांना आ. जगताप यांनी केली आहे. त्यामुळे शासनाने येथील वनविभागात या लक्षवेधीच्या अनुषंगाने पत्र पाठवून वनविभागाला माहिती मागविली आहे. युती शासनाच्या कार्यकाळातील वनविभागात पहिल्यांदाच विभागीय स्तरावर बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. अशातच या बदल्यांमध्ये घोळ झाल्याच्या आरोपाचा धूर निघू लागल्याने आ. जगताप विधिमंडळात याविषयी कोणती भूमिका घेतात, हे लवकरच स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)

Web Title: In the legislative assembly, there was a rift in the forests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.