नातेवाईंकाना सोडायला जाणे झाले स्वस्त; रेल्वे प्लॅटफार्म तिकिट पुन्हा १० रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:13 IST2021-09-19T04:13:30+5:302021-09-19T04:13:30+5:30
अमरावती : कोरोनाकाळात रेल्वे गाड्या अथवा प्लॅटफार्मवर अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी जानेवारी ते जून २०२१ दरम्यान प्लॅटफार्म तिकीट ...

नातेवाईंकाना सोडायला जाणे झाले स्वस्त; रेल्वे प्लॅटफार्म तिकिट पुन्हा १० रुपये!
अमरावती : कोरोनाकाळात रेल्वे गाड्या अथवा प्लॅटफार्मवर अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी जानेवारी ते जून २०२१ दरम्यान प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये आकारण्यात येत होते. त्यामुळे नातेवाईंकाना सोडायला जाणे आर्थिकदृष्ट्या महागले हाेते. मात्र, जुलैपासून पुन्हा प्लॅटफार्म तिकीट १० रुपये केल्याने आता प्रवाशांसह नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.
अनलॉकनंतर रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे, अशातच सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्लॅटफार्मवर नातेवाईंकांना ने-आण करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी प्लॅटफार्म तिकीट विक्रीने उच्चांक गाठला आहे. अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावर दरदिवशी सरासरी २५० तिकिटांची विक्री होत आहे. प्लॅटफार्म तिकिटांचे दर कमी झाल्याने नागरिकांना ते परवडणारे आहे. मात्र, जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या काळात तिकिटाच्या दराने नागरिकांच्या खिशाला चाट बसली, हे विशेष.
---------------------------
रोज २५० प्लॅटफार्म तिकिटांची विक्री
१) हावडा- मुंबई मार्गावरील बडनेरा रेल्वे स्थानकावर दररोज ७ ते ८ हजार प्रवाशांचे आवागमन असते. तसेच नातेवाईकांना सोडायला जाणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे.
२) मुंबई, पुणे मार्गावर ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्यादरम्यान प्लॅटफार्म तिकिटांची विक्री वाढली आहे.
३) प्लॅटफार्म तिकीट विक्रीतून रेल्वे प्रशासनाला उत्पन्न मिळू लागले आहे. कोरोनाकाळात तिकीट विक्री मंदावली असताना आता प्लॅटफार्म तिकीटचे दर कमी झाले आहे.
---------------------
सहा महिने होता ५० रुपयांचा भुर्दंड
जानेवारी ते जून २०२१ असे सहा महिने रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्म तिकिटाचे दर ५० रुपये आकारण्यात येत होते. त्यामुळे नागरिकांना या काळात प्लॅटफार्मवर नातेवाईकांना सोडायला जाणे नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ आली होती. दरम्यान खासदार नवनीत राणा यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे निवेदन देऊन प्लॅटफार्म तिकीट कमी करण्याची मागणी केली होती. जुलैपासून १० रुपये दर झाले आहे.
----------------------
सुरू असलेल्या गाड्या
- गोंदिया -मुंबई विदर्भ एक्स्प्रेस
- हावडा-मुंबई मेल, एक्स्प्रेस
- अमरावती- मुंबई एक्स्प्रेस
-नागपूर- पुणे एक्स्प्रेस, गरीबरथ
- हावडा-पुणे आझादहिंद एक्स्प्रेस
-अहमदाबाद- चेन्नई नवजीवन एक्स्प्रेस