भातकुली सोडून अचलपुरातून रेती, मातीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST2021-03-18T04:13:33+5:302021-03-18T04:13:33+5:30
महसूल विभागाची धाड : नऊ ट्रक, एका ट्रॅक्टरवर कारवाई नरेंद्र ठाकरे - परतवाडा : भातकुली तालुक्यातील पोहरा येथे लिलाव ...

भातकुली सोडून अचलपुरातून रेती, मातीची चोरी
महसूल विभागाची धाड : नऊ ट्रक, एका ट्रॅक्टरवर कारवाई
नरेंद्र ठाकरे - परतवाडा : भातकुली तालुक्यातील पोहरा येथे लिलाव झालेल्या पूर्णा नदीच्या पात्रातील रेतीघाटातून उचल न करता, अचलपूर तालुक्यातील येलकी नदीपात्रातून अवैध उत्खनन करणाऱ्या पाच ट्रकवर बुधवारी पहाटे ६ वाजता महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली. त्यापूर्वी मंगळवारी गोंडविहीर तलावातून मातीची चोरटी वाहतूक करणाऱ्या चार ट्रक आणि ट्रॅक्टरवर कारवाईने करण्यात आली. यामुळे गौण खनिज चोरट्यांमध्ये खळबळ उडाली आहे
जिल्ह्यात काही तालुक्यांतर्गत येणाऱ्या रेतीघाटांचे लिलाव गत महिन्यात झाले. त्यापैकी भातकुली तालुक्यातील पोहरा परिसरातून नियमानुसार वाळूची उचल न करता अचलपूर तालुका अंतर्गत येणाऱ्या येलकी येथील पूर्णा नदीपात्राच्या दुसऱ्याच ठिकाणावरून रेती चोरून नेली जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यावरून तहसीलदार मदन जाधव, नायब तहसीलदार शंकर श्रीराव, मंडळ अधिकारी नरेंद्र धोटे, एस.एस. बावणे, परवेश पठाण, तलाठी एस.टी. साखरे आर.आर.वाठ, कौस्तुभ रोकडे आर.डी. खानंदे, किरण गोंगे आदींच्या पथकाने कारवाई केली
बॉक्स
दोन दिवसांत नऊ ट्रक, एक ट्रॅक्टरवर कारवाई
रेतीघाटाचा लिलाव भातकुली तालुक्यातील पोहरा येथे झाला असताना, रेती चोरट्यांनी अचलपूर तालुक्यातील येलकी व परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या रेतीचोरीचा सपाटा लावला होता. त्यावरून बुधवारी पहाटे महसूल विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. त्यामध्ये दीपक चव्हाण (कांडली), फिरोज खान (मंजूरपुरा, अचलपूर), परवीन गोपाल नंदवशी (परतवाडा) मोहसीन खान रशीद खान (हीरापुरा, अचलपूर) मोहम्मद साजिद मोहम्मद सादिक (बैतूल स्टॉप, परतवाडा) यांच्या मालकीच्या पाच ट्रकवर कारवाई करण्यात आली.
गोंडविहीर तलावातून माती चोरून नेणाऱ्या नरेश भाकरे (सावळी दातुरा), नामदेव मन्नू येवले (मल्हारा गावठाण) संजय प्रजापती, रवि प्रजापती, आकाश बोरेकार (सर्व रा. सावळी दातुरा) यांच्या चार ट्रक व एका ट्रॅक्टर व कारवाई करण्यात आली.