बडनेऱ्यातील जलवाहिनीला गळती

By Admin | Updated: June 13, 2015 00:23 IST2015-06-13T00:23:06+5:302015-06-13T00:23:06+5:30

येथील पाण्याच्या टाकीपर्यंत पाणी पोहोचविणाऱ्या व एमआयडीसी मार्गावरून गेलेल्या पाईपलाईनला ठिकठिकाणी लिकेज आहेत.

Leakage of water channel in Badnera | बडनेऱ्यातील जलवाहिनीला गळती

बडनेऱ्यातील जलवाहिनीला गळती

प्राधिकरणचे दुर्लक्ष : दूषित, अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरा
येथील पाण्याच्या टाकीपर्यंत पाणी पोहोचविणाऱ्या व एमआयडीसी मार्गावरून गेलेल्या पाईपलाईनला ठिकठिकाणी लिकेज आहेत. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. बडनेरा शहराला अपुरा व दूषित पाणी पुरवठा होण्यामागेदेखील हेच कारण असल्याचे वास्तव आहे. जीवन प्राधिकरणचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने बडनेऱ्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
जीवन प्राधिकरणची पाईपलाईन एमआयडीसी मार्गाने बडनेऱ्यापर्यंत गेली आहे. निंभोरा परिसरात ज्या भागात वीटभट्ट्या आहेत तेथे पाईपलाईन लिकेज झाले आहे. महिन्याभरापासून येथील पाईपलाईनमधून पाणी वाहत आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा उघड-उघड अपव्यय सुरू आहे. परिसरातील हॉटेलधारक याचा पुरेपूर फायदा उचलत असल्याचे चित्र आहे.
याच मार्गावरील पेट्रोल पंपाजवळच्या एका नाल्यातही या पाईपलाईनला मोठे लिकेज आहे. याठिकाणी सतत पाणी वाया जाते. पुढे पावसाळा आहे. पावसाळ्यात नाले भरतात. यामुळे नाल्यातील घाण पाणी पाईपलाईनमध्ये झिरपते. तेच घाण पाणी नळाद्वारे घरोघरी पोहोचत असल्याचे चित्र आहे. जीवन प्राधिकरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. बडनेरा शहराला मागील दोन महिन्यांपासून कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. पाणी वाया जात असल्याने नागरिकांना कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. कमी पाण्याच्या पुरवठ्यामुळे बडनेरा येथील नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
बडनेरावासियांना होणारा अल्प व दूषित पाणीपुरवठा लक्षात घेता ठिकठिकाणी असलेले पाईपलाईनचे लिकेज दुरूस्त करावेत, अशी मागणी केली जात आहे.

एकाच टाकीतून पाणीपुरवठा
बडनेरा शहरातील जुन्या वस्तीतील पाण्याची टाकी जमीनदोस्त करून एक वर्षाचा कालावधी लोटला. तेव्हापासून जुन्या व नव्या वस्तीला एकाच पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकत नाही. त्यामुळे जुन्या वस्तीत तातडीने पाण्याची टाकी उभारण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यंदाच्या उन्हाळात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यामुळे बडनेरावासी त्रस्त झाले आहेत. ही समस्या तातडीने सोडविण्याची मागण्याची केली जात आहे.

एमआयडीसी मार्गावरून जाणाऱ्या पाण्याच्या लाईनवर लिकेजेस होते. त्याची दुरूस्ती करण्यात आली आहे. पुन्हा पाहणी करून लिकेजेस दुरूस्त केले जातील.
- जयप्रकाश जाधव,
अभियंता,
जीवन प्राधिकरण, बडनेरा.

Web Title: Leakage of water channel in Badnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.