संत्रा, मोसंबीवर पाने खाणारी अळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:00:14+5:30
वरूड तालुक्यात संत्रा व मोसंबीची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. यावर्षी संत्र्याचा मृग बहर निसर्गाच्या लहरीपणामुळे जमिनीवर आला आहे. यामुळे यंदा मृग बहराची संत्राफळे दुरापास्तच राहतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

संत्रा, मोसंबीवर पाने खाणारी अळी
सतीश बहुरूपी।
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा बाजार : तालुक्यात संत्रा व मोसंबीच्या झाडांवर पाने खाणारी अळी आली आहे. तिचे उच्चाटन करण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणीची लगबग केली आहे. या फवारणीसाठी लागणारी कीटकनाशके अनुदानावर उपलब्ध करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
वरूड तालुक्यात संत्रा व मोसंबीची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. यावर्षी संत्र्याचा मृग बहर निसर्गाच्या लहरीपणामुळे जमिनीवर आला आहे. यामुळे यंदा मृग बहराची संत्राफळे दुरापास्तच राहतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
यावर्षी संत्र्याचा झाडांवर पाने खाणारी अळी दिसून येत आहे. एका झाडावर ४०० ते ५०० अळ्या हमखास पडल्या असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. कुठे कुठे कोळशीची काळी माशी या नवतीवर दिसून येत आहे. वांझोट्या संत्राझाडांवर फवारणी करणे संत्राउत्पादक शेतकºयांना महाग पडत आहे.
संत्र्याच्या बागेतील काळे-पिवळे ठिपके असलेल्या अळीला ‘लेमन कॅटर पिलर’ असे म्हणतात. ही अळी फक्त झाडावरील नवीन पाने खाते. तिच्या नियंत्रणाकरिता डेल्टामेथ्रीन, लेम्बडा सायहॅलोथ्रिन, प्रोफेनोफोस अधिक सायपरमेथ्रीन किंवा अल्फामेथ्रीनची फवारणी करावी.
- श्यामसुंदर ताथोडे
प्राचार्य, स्व. पंजाबराव ठाकरे कृषी तंत्र विद्यालय, हातुर्णा
संत्राझाडांवर आलेल्या अळींचा नायनाट करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे पत्र देऊन कीटकनाशकाची मागणी केली. पाठपुरावा सुरू आहे.
- राजेंद्र बहुरूपी,
सदस्य, जिल्हा परिषद