वरूडमध्ये आघाडीच्या हालचाली

By Admin | Updated: January 11, 2017 00:18 IST2017-01-11T00:18:34+5:302017-01-11T00:18:34+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक तोंडावर आली आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाल्याने अनेक दिग्गजांना त्यांचा प्रभाग सोडावा लागत आहे,...

Leading movements in the yard | वरूडमध्ये आघाडीच्या हालचाली

वरूडमध्ये आघाडीच्या हालचाली

इच्छुकांची भाऊगर्दी : भाजपला मात देण्यासाठी नवी रणनीती आखण्याची धडपड
संजय खासबागे वरुड
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक तोंडावर आली आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाल्याने अनेक दिग्गजांना त्यांचा प्रभाग सोडावा लागत आहे, तर अनेकांवर निवडणुकीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. एकूणच तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून भारतीय जनता पक्षात उमेदवारांची भाऊगर्दी दिसून येत आहे. या पार्श्वभूमिवर काँग्रेस आणि राकाँ सावधगिरीची भूमिका घेणार असून आघाडीची शक्यता वर्तविली जात आहे.
शिवसेननेसुद्धा उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. तालुक्यात पाच जिल्हा परिषद, तर १० पं.स. सर्कल आहेत. निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक प्रस्थापितांना फटका बसला आहे. अनेकजण पर्याय शोधत असून कित्येक दिग्गजांना माघार घेतल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. अनेक प्रस्थापितांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. जरूड आणि बनोडा सर्कलवर अनेकांच्या कोलांटउड्या पडणार आहेत. नगर पालिकेत भाजपने मारलेल्या मुसंडीनंतर भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्यांची भाऊगर्दी वाढत आहे. यास्थितीत भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता दुखावला गेल्यास बंडखोरीची शक्यताही नाकारता येत नाही.
राकाँ आणि काँग्रेसमध्ये आघाडीच्या चर्चेकरिता दोन-तीन फेऱ्या पार पडल्या असल्या तरी काही सर्कलबाबत एकमत झाले नसल्याने अद्याप स्थिती स्पष्ट नाही. एरवी ग्रामीण राजकारणावर पकड ठेवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आता शिवसेना, भाजप, मनसे, बसपा, सुध्दा सक्रिय झाल्याने मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. एव्हाना तालुक्यात सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांच्या मनधरणीला सुरूवात झाली आहे.
हल्लीची परिस्थती पाहता आमनेर जि.प. सर्कल आणि आमनेर, राजुराबाजार, मांगरूळी, लोणी पंचायत समिती सर्कल काँग्रेसच्या ताब्यात आहे, तर जरुड जि.प.आणि जरुड, बेनोडा, वाठोडा, लोणी पंचायत समिती सर्कल राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. यातील लोणी पंचायत समिती सर्कलचे सदस्य भाजपात गेल्याने केवळ तीनच पं.स सर्कल आहे. टेंभूरखेडा पंचायत समिती सर्कल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांच्याकडे आहे. पुसला आणि सातनूर पं.स. सर्कल भाजपकडे आहे. हे पक्षीय बलाबल पाहता दिग्गज राजकारण्यांची मदार जरूड आणि बेनोडा जि.प.सर्कलवर आहे. जरुड हे माजीमंत्री आणि राकाँचे नेते हर्षवर्धन देशमुख यांचे स्वगृह असल्याने त्यांची पकड आजही या सर्कलमध्ये कायम आहे. तब्बल १० वर्षांनंतर आरक्षण निघाल्याने अनेकांना जिल्हा परिषद सदस्यपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. परंतु वेळेवर उमदेवारी कुणाला मिळणार, हे सद्यस्थितीत सांगता येणार नाही. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच खरे राजकीय चित्र स्पष्ट होईल.

दिग्गज माजी आमदारांना पेच
तालुक्यात राकाँचे माजी आमदार हर्षवर्धन देशमुख, काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे गट नेहमीच सक्रिय राहून सहकार ते ग्रामपंचायतीचे राजकारण चालवितात. यामुळे या दोन्ही माजी आमदारांचे तालुक्यात राजकिय प्राबल्य आहे. आता भाजपचे आ.अनिल बोंडे यांनी दोन नगर पालिकांवर निर्विवाद सत्ता मिळविल्याने या दिग्गजांना युती केल्याशिवाय पर्याय नसल्याची चर्चा आहे.

Web Title: Leading movements in the yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.