मित्रपक्षाची मर्जी सांभाळण्यात नेत्यांची कसरत

By Admin | Updated: September 8, 2014 00:57 IST2014-09-08T00:57:31+5:302014-09-08T00:57:31+5:30

महापालिकेत महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीवरुन चांगलेच राजकारण तापले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...

Leaders of the work of managing friendly pleas | मित्रपक्षाची मर्जी सांभाळण्यात नेत्यांची कसरत

मित्रपक्षाची मर्जी सांभाळण्यात नेत्यांची कसरत

अमरावती : महापालिकेत महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीवरुन चांगलेच राजकारण तापले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असलेल्या अपक्ष आणि अन्य पक्षाच्या सदस्यांची मर्जी सांभाळण्यात नेत्यांची कसरत होत असल्याचे चित्र आहे. सत्ता हस्तगत करण्यासाठी आवश्यक संख्याबळ कायम राहावे, यासाठी या सदस्याचे चोचले पुरविले जात आहे.
९ सप्टेंबर रोजी महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षासोबत अपक्ष, अन्य पक्षांचे सदस्य आघाडी फ्रंट तयार करण्यात आला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने संजय खोडके यांच्या बाजूने १६ तर राष्ट्रवादी सोबत ७ सदस्य आहेत. काँग्रेस यांच्याकडे २९ सदस्य संख्या असताना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महापौरपदाचा मोह बाजूला ठेवल्याचे दिसून येते. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला महापौर पद देण्याची तयारी काँग्रेसची आहे. त्यामुळे काँग्रेसची २९ सदस्य संख्या गृहीत धरुन राष्ट्रवादीला १५ ते १८ एवढी संख्या जुळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. राष्ट्रवादीचे नेते हे संख्याबळ जुळविण्यासाठी काही पक्षाच्या नेत्यांच्या दारीदेखील पोहचले. महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत जनविकास काँग्रेस, बसपा सदस्यांची मोलाची भूमिका राहणार असल्याने राकाँ या नेत्यांच्या संपर्कात आहे. काहीही झाले तरी संजय खोडके गटाला महापौर होऊ द्यायचा नाही, अशी रणनीती आखल्याची माहिती आहे. संजय खोडके यांच्या गटातील सदस्य राष्ट्रवादीला महापौरपदाच्या निवडणुकीत सहकार्य करणार नाही, हे अपेक्षित समजूनच त्यांनी बसपा, जनविकास काँग्रेसची मदत घेण्याचे ठरविण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला जनविकास काँग्रेसने सहकार्य करावे, यासाठी रविवारी प्रमुख दोन नेत्यांमध्ये बैठक सुद्धा झाली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत जनविकास काँग्रेसचे सदस्य राष्ट्रवादीला सहकार्य करतील, मात्र उपमहापौरपदाच्या निवडणुकीत वेगळी भूमिका घेणार या करारावरच विद्यमान आमदार आणि माजी राज्य मंत्र्यामध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सहकार्य करण्यासाठी सदस्यांना रसद पुरविली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसने उपमहापौरपदावरच लक्ष केंद्रित करुन शहराचा राजकारणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडी करावी, हे आ. रावसाहेब शेखावत यांनी निश्चित केले आहे. मात्र महापौरपदासाठी राष्ट्रवादीचा कोणता गट संख्याबळ जुळविण्यात यशस्वी होतो, त्यानंतरच पुढील चित्र ठरविण्याची अट घातली आहे. हे संख्याबळ जुळविताना राष्ट्रवादीने महापौर पदासाठी काँग्रेसच्या परंपरागत शत्रुशी हातमिळवणी केली तर वेळेवर काही वेगळेच राजकारण करण्याची छुपी तयारी काँग्रेसची आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेत्यांना मित्र पक्षाच्या सदस्यांची किमान दोन दिवस मर्जी सांभाळण्यात जणू परीक्षा असल्याचे दिसून येते. शिवसेना- भाजपच्या नेत्यांना या निवडणुकीत फार रस नसल्याचे चित्र आहे. मात्र राष्ट्रवादीच्या अंतर्गत भांडणाचा काही लाभ घेता येईल काय, या जुगाळात भाजप, शिवसेनेचे नेते आहेत. काँग्रेस वगळता सत्तेचे समिकरण बसले तर काही खुर्च्यांवर कब्जा करण्याची रणनिती युतीची आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Leaders of the work of managing friendly pleas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.