१६ आॅगस्टपासून मद्यविक्रीवर एलबीटी
By Admin | Updated: August 5, 2016 00:12 IST2016-08-05T00:12:09+5:302016-08-05T00:12:09+5:30
महापालिका क्षेत्रातील मद्यविक्रेत्यांवर स्थानिक संस्था कराची (एलबीटी) १६ आॅगस्टपासून आकारणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

१६ आॅगस्टपासून मद्यविक्रीवर एलबीटी
५० लाखांची भर : १३५ दारुविक्रेत्यांकडून वसुली
अमरावती : महापालिका क्षेत्रातील मद्यविक्रेत्यांवर स्थानिक संस्था कराची (एलबीटी) १६ आॅगस्टपासून आकारणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे आता शहरातील १३५ मद्यविक्रेत्यांकडून एलबीटी वसूल केला जाणार आहे.
राज्य शासनाने महापालिका क्षेत्रात १ जुलै २०१२ पासून एलबीटी लागू केला होता. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील प्रतिष्ठाने, दुकाने, ठोक विक्रेत्यांकडून एलबीटी वसूल करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यापोटी महापालिकेला दरमहा ७ ते ८ कोटी रुपये उत्पन्न मिळायचे. मात्र, महापालिका प्रशासनाचा उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असलेला एलबीटी भाजप-सेनेचे सरकार सत्तारूढ होताच १ आॅगस्ट २०१५ पासून हद्दपार करण्याचा निर्णय झाला. मात्र, महापालिका क्षेत्रातून एलबीटी हद्दपार करताना ज्या व्यवसायिकांची वार्षिक उलाढाल ५० कोटींपेक्षा अधिक असेल अशा व्यवसायिकांवर एलबीटी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे ५० कोटींच्या आत मद्यविक्री असलेल्या विक्रेत्यांसाठी ही बाब पर्वणी ठरली होती. मात्र, नगरविकास विभागाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता महापालिका क्षेत्रातील सर्वच मद्यविक्रेत्यांवर एलबीटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सहा टक्केप्रमाणे होणार एलबीटी वसुली
मनपाक्षेत्रात १३५ मद्यविक्रीचे परवाने आहेत. १ जुलै २०१२ तसेच २० फेब्रुवारी २०१४ च्या दरपत्रकाप्रमाणे सहा टक्क्यानुार एलबीटी वसूल होणार आहे. मद्यविक्रीतून दरमहा मनपाला ४० ते ५० लाख रुपये उत्पन्न अपेक्षित एलबीटी विभागाचे अधीक्षक सुनील पकडे यांनी दिली.