वकील इन, पक्षकार आऊट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:00:21+5:30
उच्च न्यायालयाने कोरोना विषाणूच्या अनुषंगाने गर्दी टाळण्याचे आदेश बजावले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मंगळवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फालके) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला न्यायाधीश, जिल्हा वकील संघाचे प्रतिनिधी, पोलीस प्रतिनिधी उपस्थित होते.

वकील इन, पक्षकार आऊट
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नोव्हेल कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज प्रभावित झाले. दुपारी २ ेपर्यंत ‘वकील इन, पक्षकार आऊट’ असे चित्र अनुभवता आले. न्यायालयाचे कामकाज आता दरदिवशी दुपारी २ पर्यंतच सुरू राहील, असे परिपत्रक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फलके) यांनी निर्गमित केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारपासून आरंभली. कामकाजात वकील, कर्मचारी व न्यायाधीश यांचाच समावेश राहील. वकिलांच्या सल्ल्याने प्रकरणात पक्षकारांना बोलावले जाईल.
न्यायाधीश, वकील, पोलीस प्रतिनिधींची बैठक
उच्च न्यायालयाने कोरोना विषाणूच्या अनुषंगाने गर्दी टाळण्याचे आदेश बजावले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मंगळवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फालके) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला न्यायाधीश, जिल्हा वकील संघाचे प्रतिनिधी, पोलीस प्रतिनिधी उपस्थित होते. चर्चेअंती दररोज सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत न्यायालयाचे कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. गर्दी टाळण्यासाठी पक्षकारांना न्यायालयात मनाई करण्यात आली.
प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त
मंगळवारी सकाळी ११ पासून पक्षकारांना न्यायालयात मनाई करण्यात आली होती. त्याअनुषंगाने येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे एकच प्रवेशद्वार सुरू होते. या प्रवेशद्वारावर पक्षकारांना आत जाण्यास मज्जाव करण्यात आला. अतिमहत्त्वाच्या प्रकरणांमध्ये पक्षकारांची साक्ष किंवा उपस्थिती अनिवार्य असल्याचे संबंधित वकिलांकडून जाणून घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना प्रवेश दिला, हे विशेष.
जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत चालणार आहे. अतिमहत्त्वाच्या प्रकरणांमध्ये वकिलांच्या सल्ल्यानुसार पक्षकारांना बोलावले जाईल. काही प्रकरणांत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग वापरले जाणार आहे.
- महेंद्र तायडे
अध्यक्ष, जिल्हा वकील संघ