कायदा रुग्णसेवेपेक्षा मोठा नाही
By Admin | Updated: October 8, 2016 00:19 IST2016-10-08T00:19:40+5:302016-10-08T00:19:40+5:30
रुग्णसेवा ईश्वर सेवा सांगणारे किती डॉक्टर रुग्णांसोबत संवाद साधतात आणि किती अरेरावी करतात,..

कायदा रुग्णसेवेपेक्षा मोठा नाही
बच्चू कडू : उपजिल्हा रुग्णालयात स्पंदन मेळावा
परतवाडा : रुग्णसेवा ईश्वर सेवा सांगणारे किती डॉक्टर रुग्णांसोबत संवाद साधतात आणि किती अरेरावी करतात, याचा प्रत्यय अनेकांना आपापल्या जीवनात येतो. आपण आतापर्यंत जवळपास ६५ हजार रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करवून घेतल्यात. त्यासाठी पहिल्यांदा विना तिकीट मुंबई प्रवास करावा लागला, मानवतेसाठी कायदा तोडून रुग्णसेवेचे कार्य करावे लागले, असे प्रतिपादन आ. बच्चू कडू यांनी केले.
अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित स्पंदन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक मो. जाकीर, पं.स.सभापती गजानन भोरे, विकास अधिकारी सावरकर, पी.वा. शहाणे, हर्षवर्धन हरले, अंकुश जवंजाळ, सा.बां. विभागाचे अभियंता प्रमोद भिलपवार, गोपाल बकालेंसह मान्यवर उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालयात शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदय शस्त्रक्रिया यशस्वी बालकांचा स्पंदन मेळावा ४ आॅक्टोबर रोजी झाला.
तालुक्यातील सर्वच शाळेतील ६७ विद्यार्थ्यांची हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यासाठी पालकांना कुठलाच खर्च करावा लागत नाही. त्या विद्याथर्यांच्या पुढील भविष्यासाठी या स्पंदन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शून्य खर्चातून करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियांमध्ये तालुक्यातील सर्वच शाळांच्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती. (तालुका प्रतिनिधी)
हिवाळी अधिवेशनात मुदतवाढ
राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत केंद्रशासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना संपत आल्या आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनात आपण त्या योजनांची मुदतवाढ करण्यासाठी मागणी करणार असल्याचेसुद्धा आ. बच्चू कडू यांनी उपसचिवांना सांगितले.
कुष्ठरोगी हृदयरुग्णांना औषधी
शासनाच्या ढीगभर योजना आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्या पोहोचविल्याच जात नाहीत. योजना कागदावर तयार होऊन तेथेच थांबविण्याचे सत्य आहे, तर काही योजना तयारच का केल्या आणि त्यांचा लाभ तरी कुणाला मिळणार, असा संतापजनक प्रश्न निर्माण होत असल्याचे आ. बच्चू कडू यांनी सांगीत कुष्ठरोग व हृदयरोग रुग्णांना लवकरच सहाशे रुपये प्रतिमहिना औषधी खर्च लागू करून देऊ. शासन निर्णय फार अडगळीचा आहे. १८ वर्षांवरील रुग्ण व बापलेक कमावते नको असा तो निर्णय राज्यात फक्त अचलपूर तालुक्यात मानवतेचा दृष्टिकोन पुढे ठेवून आपण शिथिल केल्याचेसुद्धा त्यांनी सांगितले.
६५ हजार मोफत शस्त्रक्रिया
१९९९ पासून आपण रुग्णांना अविरतपणे मुंबई येथील जे.जे., अंबानी. हिंदुजासारख्या अत्यंत महागड्या दवाखान्यात शस्त्रक्रियेसाठी नेले. आजपर्यंत किमान ६५ हजारांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्यात. किमान २ लक्ष रुपयांच्या वर खर्च संबंधित रुग्णांसाठी करावा लागला तर त्यांच्याच बेलोरा गावातील जामोदकर यांच्या शस्त्रक्रियेसाठी तब्बल २१ लक्ष रुपये खर्च करण्यात आला होता. ती शस्त्रक्रियासुद्धा मोफत करण्यात आली होती. पहिल्यांदा विनातिकिट प्रवास करून शस्त्रक्रिया केल्याचा अनुभव आयोजित मेळाव्यात आ.बच्चू कडू यांनी उपस्थितांसमोर कथन केला.