वृक्षदिंडीने वनमहोत्सवाचा शुभारंभ; हरितक्रांतीची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 23:58 IST2016-07-01T23:58:21+5:302016-07-01T23:58:21+5:30

राज्यात १ ते ७ जुलै दरम्यान वनमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

Launch of the festival of woods; Movement of Green Revolution | वृक्षदिंडीने वनमहोत्सवाचा शुभारंभ; हरितक्रांतीची वाटचाल

वृक्षदिंडीने वनमहोत्सवाचा शुभारंभ; हरितक्रांतीची वाटचाल

अमरावती : राज्यात १ ते ७ जुलै दरम्यान वनमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाचा शुभारंभ विद्यापीठ परिसरात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते वृक्षारोपणाने शुक्रवारी झाला. यावेळी काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीमध्ये पालकमंत्री स्वत: सहभागी झाले होेते.
यावेळी खा. आनंदराव अडसूळ, आ.बच्चू कडू, जिल्हाधिकारी किरण गित्ते, कुलगुरू मुरलीधर चांदेकर, कुलसचिव अजय देशमुख, माजी कुलगुरू व्ही.एस. सपकाळ, प्र-कुलगुरु जयकिरण तिडके, मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, उपवनसंरक्षक नीनू सोमराज, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक प्रदीप मसराम, जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत, भाजपच्या वैशाली झटाले आदी उपस्थित होते.
यावेळी ना. पोटे म्हणाले, विद्यापिठाचा परिसर भव्य आहे. नागरिक पहाटे येथे फिरण्याकरिता येतात. शुद्ध प्राणवायू येथे नागरिकांना मिळतो. इतकेच नव्हे तर गाडगेबाबांनी साक्षरता व वनसंवर्धनाचा संदेश दिला आहे. त्यामुळे या परिसरात अधिकाधिक झाडे लावली जावीत. राज्यात वृक्षलागवडीची चळवळ सुरु असून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनदेखील पालकमंत्र्यांनी केले.
यावेळी बोलताना खा. आनंदराव अडसूळ म्हणाले, वृक्षाचे माणसाशी आजन्म नाते आहे.राज्याची लोकसंख्या ११ कोटी आहे. प्रत्येकाने एक झाड लावले तरी उद्दिष्ट्यपूर्ती होऊ शकते.
कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी वृक्षारोपण ही जागतिक गरज असल्याचे सांगितले.

विद्यापीठात ‘हरितसंकल्प’
अमरावती : विद्यापिठाची ४५० एकर जमीन व तरूण मनुष्यबळ आणि रासेयोचे २५ हजार (एनएसएस) विद्यार्थी विद्यापीठाकडे आहेत. या मनुष्यबळाचा वापर महसूल विभागाच्या सहकार्याने करून अमरावती विभागातील ७० टक्के रिकाम्या जागेवर वृक्षारोपण करून विद्यापीठ परिसर संपूर्ण हरित करण्यासाठी २०१६ पर्यंत वृक्षलागवड केली जाईल. विद्यापीठ परिसरात १५१ झाडे लावण्यात आली आहेत. वृक्षदिंडीपूर्वी उपस्थित पाहुण्यांनी वृक्षपूजन करुन वनमहोत्सवाचा शुभारंभ केला. पश्चात वृक्ष देऊन अतिथींचे स्वागत करण्यात आले. संचालन विलास नांदूरकर तर उपसंचालक सामाजिक वनिकरण प्रदीप मसराम यांनी आभार प्रदर्शन केले. (प्रतिनिधी)

दुपारपर्यंत पाच लक्ष वृक्षारोेपण : जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात जिल्ह्यात ४ लक्ष ८० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असताना दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यात ५ लाख रोपट्यांचे रोपण करून उद्दिष्ट्यपूर्ती केली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत ३ लक्ष ६३ हजार झाडे लावण्यात आली होती. या सर्व झाडांचे संवर्धन करण्यासाठी २०० झाडांमागे एक मजूर तसेच तारेचे कुंपण करून वृक्षांचे जतन करण्यात येईल. जलयुक्त शिवार योजनेच्या २५० गावांमध्ये १ लाख ८० हजार झाडे लावल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Launch of the festival of woods; Movement of Green Revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.