साश्रूनयनांनी दिला अखेरचा निरोप

By Admin | Updated: July 27, 2015 00:19 IST2015-07-27T00:19:31+5:302015-07-27T00:19:31+5:30

केरळ व बिहारचे माजी राज्यपाल, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे ज्येष्ठ नेते रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांना हजारो कार्यकर्ते,

The last word delivered by the trustees | साश्रूनयनांनी दिला अखेरचा निरोप

साश्रूनयनांनी दिला अखेरचा निरोप

दादासाहेब : आंबेडकरी राजकारणाचे अभिजात रूप हरविले
गणेश वासनिक अमरावती
केरळ व बिहारचे माजी राज्यपाल, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे ज्येष्ठ नेते रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांना हजारो कार्यकर्ते, चाहते, समर्थकांनी साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने आणि दादासाहेब गायकवाड यांच्या तालमीत राजकीय नेतृत्त्वाचा जो आदर्श त्यांनी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वातून घालून दिला तो आता पडद्याआड गेला आहे.
दादासाहेबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी येथील काँग्रेसनगर स्थित ‘कमलकृष्ण’ या निवासस्थानी रविवारी सकाळपासून हजारोंच्या संख्येने गर्दी झाली होती. शनिवारी दादासाहेबांच्या निधनाची वार्ता पसरताच राज्यभरातून त्यांच्या समर्थकांनी मिळेल त्या वाहनांनी अमरावती गाठले.
मागील काही दशकांपासून आंबेडकरी राजकारणाला नवे रूप देणारे दादासाहेब आता आपल्यात नाहीत, या भावनेने दिग्गजांपासून तर सामान्यांपर्यंत हजारो लोकांनी ‘कमलकृष्ण’वर अंतिम दर्शनासाठी धाव घेतली होती.
दरम्यान दादासाहेबांचे पार्थिव दर्शनासाठी बाहेर आणताच एकच झुंबड उडाली. गर्दी निवळण्यासाठी काही वेळ पोलिसांना कसरत करावी लागली. अखेर कार्यकर्त्यांनीच संयम बाळगत दादासाहेबांचे शांततेत दर्शन घेतले.

अन् समर्थकांचे डोळे पाणावले
रविवारी ‘कमलकृष्ण’वर दादासाहेबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. लाडक्या नेत्याला अंतिम एक क्षण बघण्याची आस लागली असताना पार्थिव दर्शनासाठी आणताच ज्यांच्यावर दादासाहेबांनी अनंत उपकार केले अशांच्या डोळ्यातून न कळत आसवे बाहेर पडलीत. आता दादासाहेबांसारखी व्यक्ती पुन्हा होणे नाही, अशा भावना प्रकट करून दर्शन घेतले आणि श्रद्धांजली अर्पण केली.

काँग्रेसतर्फे पुष्पचक्र अर्पण
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार दादासाहेब गवई यांच्या पार्थिवावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसतर्फे पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धाजंली वाहिली. सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी दादासाहेबांच्या निधनाबद्दल गवई कुटुंबीयांना दु:खद संवेदना कळविल्यात. विशेषत्वाने काँग्रेसतर्फे खा. अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, आ. माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नितीन राऊत, माजी खा. नरेशचंद्र पुगलिया यांना दादासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी पाठविण्यात आले होते.

दादासाहेबांच्या निधनाने महाराष्ट्र शोकाकूल झाला आहे. त्यांनी विधानपरिषद व राज्यसभेत गाजविलेली कारकीर्द चिरकाल स्मरणात राहील. सर्वांना आदरयुक्त असे नेते दादासाहेब होते. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक संवेदना कळविल्या आहेत.
- अशोक चव्हाण,
खासदार, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

दादासाहेब म्हणजे राजकारणातले अजातशत्रू. त्यांनी केरळ व बिहारचे राज्यपालपदी चांगली कारकीर्द गाजवली. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतला तारा निखळला आहे. काँग्रेस, रिपाइं मैत्री पर्वाचे शिल्पकार दादासाहेब गवई हेच आहेत.
- राधाकृष्ण विखे पाटील,
विरोधी पक्षनेता, विधानसभा.

Web Title: The last word delivered by the trustees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.