समाजातील शेवटच्या माणसाचा विचार व्हावा
By Admin | Updated: April 20, 2015 00:24 IST2015-04-20T00:24:26+5:302015-04-20T00:24:26+5:30
समाजातील वंचित व दुर्लक्षित घटकांच्या विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. ..

समाजातील शेवटच्या माणसाचा विचार व्हावा
चर्मकार समाजाचा मेळावा : पालकमंत्र्यांचे प्रतिपादन
अमरावती : समाजातील वंचित व दुर्लक्षित घटकांच्या विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ गरजवंतापर्यंत पोहोचवून अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग, खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात रविदास विश्वभारती प्रतिष्ठान व रविकिरण वधू-वर सूचक केंद्राच्यावतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री बोलत होते. माजीमंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी खा. आनंदराव अडसूळ होते. आ.सुनिल देशमुख, आ. अनिल बोंडे, आ. रमेश बुंदीले, आ.रामंचद्र अवसरे संयोजक राजीव जामठे, सुदाम वानरे आदी व्यासपीठावर होते.
समाजामुळेच आपण मोठ्या पदावर आहोत याचा अधिकाऱ्यांना विसर पडू देऊ नये. समाज मंदिर हे चांगले संस्कार घडविण्यासाठी असतात, अशा समाज मंदिरातून समाज घडावा, अशी अपेक्षा व्यक्त करत पालकमंत्र्यांनी या समाज मंदिरासाठी एक एकर जागा उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली.
सामूहिक विवाह मेळाव्यामुळे समाजाचा प्रभाव वाढतो, असे प्रतिपादन उद्घाटक बबनराव घोलप यांनी केले. मुलांना उच्चशिक्षित करण्यासाठी प्रोत्साहन देऊन मदत केली पाहिजे. मी स्वत: अशी १२ मुलं दत्तक घेतली असून त्यांना आयएएस, आयपीएस बनविणार असल्याचा मानस घोलप यांनी व्यक्त केला.
खा. आनंदराव अडसूळ अध्यक्षीय मार्गदर्शन करताना म्हणाले, समाजाच्या अधिकाऱ्यांना एकत्रित आणून समाज विकासाची कामे त्यांच्या माध्यमातून झाली पाहिजे. सामाजिक संघटन मजबूत असले तर सर्व समस्या सुटू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
समाजाच्या वतीने पालकमंत्र्यांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्वागताध्यक्ष आ. रमेश बुंदिले यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संयोजक राजीव जामठे यांनी मेळव्या मागील पार्श्वभूमि स्पष्ट केली. या मेळाव्यास समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.