-तर वाचली असती लाखभर संत्राझाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:32 IST2019-07-03T23:31:49+5:302019-07-03T23:32:19+5:30
चारघड प्रकल्पात पाणी असूनही ते संत्राबागा आणि इतर पिकांसाठी सोडण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. पाणी सोडले असते, तर एक लाखाहून अधिक संत्र्याची झाडे वाचू शकली असती. याबाबत कुणीच लोकप्रतिनिधी अवाक्षरही काढत नसल्याबाबत संत्राउत्पादकांमध्ये रोष आहे. मतदारसंघाचे आमदार व विद्यमान कृषिमंत्र्यांची चुप्पी सर्वाधिक बोचरी ठरली आहे.

-तर वाचली असती लाखभर संत्राझाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चारघड प्रकल्पात पाणी असूनही ते संत्राबागा आणि इतर पिकांसाठी सोडण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. पाणी सोडले असते, तर एक लाखाहून अधिक संत्र्याची झाडे वाचू शकली असती. याबाबत कुणीच लोकप्रतिनिधी अवाक्षरही काढत नसल्याबाबत संत्राउत्पादकांमध्ये रोष आहे. मतदारसंघाचे आमदार व विद्यमान कृषिमंत्र्यांची चुप्पी सर्वाधिक बोचरी ठरली आहे.
सन २००६ मध्ये चारघड प्रकल्पावर असलेल्या गावांना पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष होता. डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. गावकऱ्यांनी एकत्र येऊन कालव्याचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि गोळीबार केला. यात एका तरुणाने प्राण गमावला. आता मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पावसामुळे भूजलस्तर खालावला. यामुळे मोर्शी तालुक्यातील खेड, उदखेड, लाडकी, खोपडा, बोडना आदी गावांमधील विहिरींचे पाणी आटले. पिण्याचेही पाणी उपलब्ध नसल्याचे पाहून चारघड धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी डॉ. बोंडे यांनी केली होती. दुसरीकडे यंदा तिवसा तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केल्यानंतर आमदार यशोमती ठाकूर यांनी अप्पर वर्धा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी करताच त्याला डॉ. बोंडे यांनी प्रचंड विरोध दर्शवला. येत्या काही वर्षांमध्ये पाण्याचा संघर्ष तीव्र होत जाणार आहे. यात मात्र शेतकºयांचे मरण होणार असल्याचे वास्तव आहे. यासंदर्भात ना. अनिल बोंडे यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.
पाण्याच्या विषयावर राजकारण गैरच
वर्धा नदीपात्र आटल्याने तिवसा शहराला दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने अप्पर वर्धा धरणातून वर्धा नदीला पाणी सोडण्याची मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली होती. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या आंदोलनानंतर नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे काही गावांना दिलासा मिळाला खरा; पण यातून झालेले राजकारण सर्वसामान्यांना भावले नसल्याचे रोखठोक मत नितीन देशमुख यांनी व्यक्त केले.
संत्रा वाळला; जबाबदार कोण?
मुळात प्रश्न आहे तो पाण्याचा नियोजनाचा. डॉ. अनिल बोंडे हे कृषिमंत्री असल्याने त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आली आहे. त्यांच्याच मोर्शी मतदारसंघात पाण्याच्या नियोजनाअभावी चारघड धरणाच्या परिसरातील लाखांवर संत्र्याची झाडे वाळली. त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. चारघड धरणात पाणी असतानादेखील संत्र्याची झाडे जगवण्यासाठी ते का सोडण्यात आले नाही, असा सवाल नितीन देशमुख यांनी केला आहे.