१,९६३ गावांची अंतिम ७० पैसेवारी
By Admin | Updated: January 1, 2017 00:46 IST2017-01-01T00:46:37+5:302017-01-01T00:46:37+5:30
पैसेवारी काढण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आल्याने यंदा खरिपाची अंतिम पैसेवारी १५ जानेवारी ऐवजी ३१ डिसेंबरला

१,९६३ गावांची अंतिम ७० पैसेवारी
उरफाटा न्याय : सोयाबीन, मुगाचे मोठे नुकसान
अमरावती : पैसेवारी काढण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आल्याने यंदा खरिपाची अंतिम पैसेवारी १५ जानेवारी ऐवजी ३१ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. जिल्ह्यात लागवडीयोग्य एक हजार ९६३ गावात ७० पेसेवारी जिल्हा प्रशासनाने काढली. यंदाच्या हंगामात प्रतिकुल हवामानामुळे सोयाबीन, मूग, उडीद व तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकताच झाल्याच्या पार्श्वभूमिवर ५० पैशांपेक्षा अधिक पैसेवारीने शासन खूष असले, तरी शेतकऱ्यांत मात्र नाराजी आहे.
जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक असा १२० टक्के पाऊस पडला. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत ८१४ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ९७८ मिमी पाऊस पडला.सुरूवातीला काळात अधिक पावसाने अल्प कालावधीचे सोयाबीन, मुग व उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर काळ्या जमिनीच्या शेतामधील तुरीवर ‘मर’ रोग येऊन हजारो एकरातील पीक नष्ट झाले आहे. तर ७ आॅगस्टनंतर महिनाभर पावसाने खंड दिल्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत. यामुळे सरासरी उत्पन्नात कमी आली. सोयाबीन सोंगणी व मळणीच्या हंगामात सतत पाऊस झाल्याने ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव, वातावरणात व जमिनीत वाढलेली आर्द्रता यामुळे सोयाबीनच्या शेंगांमधील दाण्यांचे अंकुरण झाले. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अतिपावसामुळे कपाशीची पातेगळ व प्रतिकुल स्थितीमुळे ‘लाल्याचा’ प्रादुर्भाव झाला.
डिसेंबरच्या अखेरच्या दोन आठवड्यात अति थंडीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील उभी तूर जळाली. त्यामुळे सरासरी उत्पन्नात कमी येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खरीपाची अंतिम ७० पैसेवारी जाहीर केली. यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी मदत मिळण्यास अडसर निर्माण होणार आहे. (प्रतिनिधी)