शासकीय विश्रामगृहातील अन्नात अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 00:03 IST2017-02-23T00:03:48+5:302017-02-23T00:03:48+5:30

शासकीय विश्रामगृहात निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ देण्यात येत असल्याची तक्रार बुधवारी काही खासगी कर्मचाऱ्यांनी अन्न, औषधी प्रशासन विभागाकडे केली.

Larvae in government lodging | शासकीय विश्रामगृहातील अन्नात अळ्या

शासकीय विश्रामगृहातील अन्नात अळ्या

सोयाबीन वड्यांच्या भाजीमुळे प्रकार उघडकीस
अमरावती : शासकीय विश्रामगृहात निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ देण्यात येत असल्याची तक्रार बुधवारी काही खासगी कर्मचाऱ्यांनी अन्न, औषधी प्रशासन विभागाकडे केली. बुधवारी दुपारी कर्मचाऱ्यांना जेवणात दिल्या गेलेल्या सोयाबीन वड्यांच्या भाजीत चक्क अळ्या आढळून आल्याने हा प्रकार उघड झाला व खळबळ उडाली.
शासकीय अधिकारी, राजकीय नेतेमंडळी प्रसंगी मंत्री देखील दौरे व इतर कामांसाठी शहरात आल्यानंतर शासकीय विश्रामगृहात थांबतात. वर्षभर येथे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आवागमन सुरू असते. येथे येणाऱ्या आगंतुकांना विश्रामगृहात योग्य त्या सोयी पुरविण्यात येतात. निवासासोबतच जेवणाचीही सोय याठिकाणी आहे. येथील कामकाजासाठी काही खासगी कर्मचारी सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनाही दुपारचे जेवण संबंधित कंत्राटदारामार्फत मोफत दिले जाते. मात्र, हे जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप येथील खासगी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

एफडीएकडे तक्रार
अमरावती : बुधवारी काही खासगी कर्मचारी दुपारचे जेवण घेत असताना त्यांना भाजीमध्ये चक्क अळ्या आढळून आल्यात. त्यांनी एफडीएचे कार्यालय गाठून तक्रार नोंदविली. सूरज भातकुले, विजय चौखंडे, प्रकाश जाधव, अंकुश गुडधे, सलमान पठाण, शेख जमीर, अजय खंडाईत, सुशील वानखडे, अमोल सावळे, जगदीश माहुरे, यशोदीप पंडित, निरंजन तायडे, दिपील गीरे आदींचा तक्रारकर्त्यांमध्ये समावेश आहे. यातक्रारींच्या अनुषंगाने अन्न व औषधी प्रशासनाचे प्रभारी सहआयुक्त जयंत वाणे व अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

‘व्हीआयपीं’ना सुद्धा निकृष्ट जेवण
शासकीय विश्रामगृहात मंत्री व शासकीय अधिकारी सुद्धा जेवण करतात. त्यांनाही असेच निकृष्ट जेवण दिले जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या गंभीर प्रकाराबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

काही कर्मचाऱ्यांना पोटाचे आजार
शासकीय विश्रामगृहातील जेवणाचे कंत्राट हे मुंबईच्या ‘शताक्षी इंटरप्राईजेस’ची एक जबाबदार व्यक्ती चार वर्षांपासून चालवित असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. चार वर्षांपासून अनेकदा जेवणात खडे व अळ्या आढळल्या आहेत. यामुळे काही कर्मचाऱ्यांना पोटाचे आजार सुद्धा जडले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रकाश जाधव नामक कर्मचाऱ्याला पोटाच्या विकाराने ग्रासले होते. अतिसार व पोटदुखीचा त्रास जाणवल्याने प्रकाश हे त्यावेळी डॉक्टरांकडे गेले होते. डॉक्टरांनीही अन्नातून विषबाधा झाल्याचे कारण सांगितल्याचे प्रकाश जाधव यांचे म्हणणे आहे.

Web Title: Larvae in government lodging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.