५० वर्षांनंतर परत मिळाली मारुती संस्थानची जमीन
By Admin | Updated: July 5, 2015 00:21 IST2015-07-05T00:21:12+5:302015-07-05T00:21:12+5:30
वडाळा येथील मारोती देवस्थानची जमीन येथील एक शेतकरी ५० वर्षांपासून वहीवाट करीत होते.

५० वर्षांनंतर परत मिळाली मारुती संस्थानची जमीन
न्याय : पोलीस, ग्रामपंचायतीची मध्यस्थी, सदस्यांसमवेत घेतला ताबा
वरूड : वडाळा येथील मारोती देवस्थानची जमीन येथील एक शेतकरी ५० वर्षांपासून वहीवाट करीत होते. सदर जमिनीचा ताबा देण्यास सदर शेतकरी तयार नव्हते. मात्र, ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन ५० वर्षांनंतर देवस्थानची जमीन पोलीस आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसमक्ष ताब्यात घेऊन पेरणी केली आहे.
वडाळा येथे प्राचीन मारोतीचे मंदिर असून या देवस्थानाचे विश्वस्त कारभार पाहतात. या देवस्थानाला मंदिराचा कारभार करता यावा म्हणून त्या काळात ५० वर्षांपूर्वी दानदात्यांनी २ हेक्टर ५९ आर शेतजमीन दान दिली होती. सदर शेतजमीन येथीलच एका कुटुंबाने वाहितीसाठी घेतली होती. यातून निघणाऱ्या उत्पन्नाचा काहीच वाटा देवस्थानला मिळाला नाही. सदर जमीन वाहितदाराने देवस्थानाला परत द्यावी, अशी मागणी देवस्थानचे विश्वस्त आणि ग्रामस्थ वारंवार करीत होते. परंतु वाहितदार परत देण्यास तयार नव्हते. याकरिता ग्रामपंचायतीने ेग्रामसभेत ठरावसुध्दा घेतला होता. सदर वाहितदार हे तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष असल्याचे सांगण्यात येते. आज प्रत्यक्ष शेकडो गावकऱ्यांनी शेतात जाऊन ताबा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहितदाराने नकार दिल्याने असंतोष उफाळून आला होता. गावकऱ्यांनी पेरणीचे साहित्य सुध्दा सोबत नेले होते. वाद विकोपाला जात असल्याचे पाहून पोलिसांना दूरध्वनीवरुन माहिती देऊन बोलाविण्यात आले. यावेळी ठाणेदार मुकुंद ठाकरे यांनी पोलीस ताफ्यासह जाऊन दोन्ही पक्षाला समजावून सांगितले. यानंतर तडजोडीने हा वाद मिटविण्यात आला. मात्र वाहितदाराचे दोन सदस्य विश्वस्त मंडळात घेण्यात यावे, अशी अट घातली. सर्वांनुमते विश्वस्त मंडळात दोन सदस्य घेण्याचा निर्णय ग्रामपंचायत, गावकरी, देवस्थान विश्वस्त मंडळाने घेतला. वाहितदाराने ५० वर्षांपासूनची जमीन परत देत असल्याचे जाहीर करताच आनंदाची लहर निर्माण झाली. अख्ख्या गावाने या शेताची एकाच दिवशी पेरणीसुध्दा केली. अखेर सामोपचाराने येथील प्रलंबित देवस्थानच्या जमिनीचा प्रश्न निकाली निघाला. (तालुका प्रतिनिधी)