- आणि अमरावतीत लँड झाली 'एअर अॅम्ब्युलन्स'
By Admin | Updated: October 20, 2016 00:12 IST2016-10-20T00:12:02+5:302016-10-20T00:12:02+5:30
जीवघेणी स्पर्धा आणि स्वार्थाच्या या दुनियेत सामाजिक दायित्व जपणारे व्यक्ती आजही आहेत.

- आणि अमरावतीत लँड झाली 'एअर अॅम्ब्युलन्स'
ऋण मातीचे : विलास कथे यांची सहृदयता
अमरावती : जीवघेणी स्पर्धा आणि स्वार्थाच्या या दुनियेत सामाजिक दायित्व जपणारे व्यक्ती आजही आहेत. असाच अनुभव अमरावतीने नुकताच घेतला. अमरावती जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले आणि बॉलीवुडमध्ये प्रभाव असलेले विलास कथे यांनी लागलीच ‘एअर अॅम्बुलन्स’ सेवा उपलब्ध करून दिल्याने येथील ठाकरसी सोमय्या (८५) या वयोवृद्ध व्यक्तीला काही तासांतच उपचारार्थ मुंबईला हलविता आले. यासाठी कथे यांनी कुठलाही व्यावसायिक लाभ घेतला नाही.
विलास कथे हे मुळचे परतवाडा येथील रहिवासी आहेत. मुंबईत ते व्यावसायिक तत्त्वावर हेलिकॉप्टर सेवा पुरवितात. स्थानिक रहिवासी ठाकरसी सोमय्या (८५) हे डॉ. रोहित चोरडिया यांच्या रूग्णालयात दाखल होते. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ठाकरसी यांच्या शरीरातील अवयव निकामी होत असल्याचे डॉ. चोरडिया यांच्या निदर्शनास आले. त्यांच्यावर मुंबईत तीन ते चार तासांत पुढील उपचार होणे आवश्यक होते. रूग्णाचे नातेवाईक अमित सोमय्या यांनी महापौर चरणजित कौर नंदा यांच्याशी दुपारी साडेबारा वाजता संपर्क केला. महापौरांनी विलास कथे यांना अडचण सांगितली. मातीचे ऋण फेडण्याची संधी म्हणून व्यावसायिक लाभाविना कथे यांनी ‘एअरबस अॅम्बुलन्स’ उपलब्ध करून दिली. क्लिष्ट विमानतळ नियमांची आवश्यक ती पूर्तता करून दोन तासांत बेलोरा विमानतळावर एअर अॅम्बुलन्स पोहोचली. मुंबईत केवळ दोनच एअर अॅम्ब्युलन्स आहेत, हे विशेष.
साडेबारा वाजता एअरबस अॅम्बुलन्ससाठी फोन आला. दुपारी सव्वा तीन वाजता एअर अॅम्बुलन्सने बेलोरा विमानतळ गाठले. पुढल्या सव्वा तासात रुग्णाला मुंबईत पोहोचविले. मातीचे ऋण फेडण्याची संधी होती. इवलासा प्रयत्न केला.
-विलास कथे, मुंबई
ठाकरसी सोमय्या यांच्यावर उपचार सुरु असताना अचानक ते कोमात गेले. मंगळवारी दुपारपर्यंत सगळे प्रयत्न करण्यात आले. अधिक उपचारासाठी त्यांना मुंबईत हलविण्याचा निर्णय झाला व अंमलात आला.
-रोहित चोरडिया
हृदयरोग तज्ज्ञ, अमरावती
रुग्णाला मुंबईत हलविण्यासाठी महापौर आणि विलास कथे यांची अमुल्य मदत झाली. त्यांनी याकामी त्यांच्या व्यावसायिक लाभावर पाणी सोडले. अमरावतीत डॉ.चोरडिया आणि एअर अॅम्ब्युलन्समध्ये डॉ.एजाझ खान यांनी मोठीच मदत केली.
- अमित सोमय्या,
रुग्णाचे नातेवाईक