अचलपूर मुख्याधिकारी कक्षाला आरोग्य सभापतींनी लावले कुलूप
By Admin | Updated: February 4, 2016 00:14 IST2016-02-04T00:14:07+5:302016-02-04T00:14:07+5:30
नगरपालिका विकासकामांसाठी असलेल्या सव्वादोन कोटी रुपयांचा निधी तंत्रनिकेतन विद्यालयाच्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना नियमबाह्यरित्या वाटप केल्याच्या निषेधार्थ ...

अचलपूर मुख्याधिकारी कक्षाला आरोग्य सभापतींनी लावले कुलूप
सव्वादोन कोटींचे प्रकरण : शिक्षकांना दिला नियमबाह्य विकासनिधी
नरेंद्र जावरे परतवाडा
नगरपालिका विकासकामांसाठी असलेल्या सव्वादोन कोटी रुपयांचा निधी तंत्रनिकेतन विद्यालयाच्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना नियमबाह्यरित्या वाटप केल्याच्या निषेधार्थ बुधवारी दुपारी १ वाजता स्वच्छता व आरोग्य सभापती राजू लोहिया यांनी कुलूप ठोकल्याने पालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.
अचलपूर नगर पालिकेंतर्गत तंत्रनिकेतन महाविद्यालय चालविण्यात येते. येथे शिक्षक व शिक्षकेतर असे एकूण ५१ कर्मचारी कार्यरत आहेत. या तंत्रनिकेतनवर शासनातर्फे कुठल्याच प्रकारचा निधी दिला जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या शुल्कावर तंत्रनिकेतनच्या कर्मचारी शिक्षकांचे वेतन व सादिल खर्च चालविता जातो. मात्र, या ५१ कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी ते सप्टेंबर २०१५ या सात महिन्यांचे वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.
नियमबाह्य दिले वेतन
नगरपालिकेला शासनाचा १२ वा १३ वा वित्तआयोग, रमाई आवास योजना एसजेवाय, नागरी दलित वस्ती आणि वेगवेगळ्या कोट्यवधी रुपयांचा निधी येथे विविध बॅँकांमध्ये या निधीवर मिळणारे व्याज दोन कोटी रुपये शिल्लक होते.
ही व्याजी रक्कम केवळ नागरी विकासकामांवर खर्च करण्याचा शासनाचा नियम आहे. हा निधी तंत्रनिकेतन कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च करु नये, तसे पत्र सुद्धा राज्य शासनाने १९ जानेवारी २०१६ रोजी अचलपूर नगर पालिकेला एका अर्जाच्या उत्तरादाखल पाठविले असताना नियमबाह्यरीत्या वेतन कापूस देण्यात आल्याचा आरोप स्वच्छता व आरोग्य सभापती राजेंद्र लोहिया यांनी केला.
आणि कुलूप ठोकले
या प्रकाराबद्दल मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांना आपण बुधवारी सकाळी ७ वाजता दूरध्वनीवर माहिती देऊन सकाळी ११ वाजता त्यांच्या कक्षात भेटण्याची व या प्रकरणाची माहिती देण्याची विनंती केली. त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी होकार दिला. मात्र, दुपारी १ वाजेपर्यंत ते आले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोग्य सभापती राजेंद्र लोहिया यांनी कुलूप ठोकल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.
मुख्याधिकारी
राहतात बेपत्ता
अचलपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय जावळीकर २६ जानेवारीनंतर थेट २ फेब्रुवारी रोजी कार्यालयात आले. ते सतत गैरहजर राहात असल्याने नगरपालिकेच्या भोंगळ कारोभारावर कुणाचाच वचक राहिलेला नाही. संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा समन्स देऊन त्यांच्यावर काहीही परिणाम होत नसल्याने त्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध नगरसेवकांमध्ये संताप व्यक्त असल्याचा आरोप राजेंद्र लोहिया यांनी केला आहे.