महाराष्ट्र दिनी विठ्ठलाच्या भाजी-पोळी केंद्रात लाडू
By Admin | Updated: April 29, 2015 00:20 IST2015-04-29T00:20:00+5:302015-04-29T00:20:00+5:30
शहरातील अंध अपंगांना मिष्ठान्न मिळावे यासाठी विठ्ठल सोनवळकर यांच्या भाजी-पोळी केंद्रात हिंदू संस्कृतीतील ...

महाराष्ट्र दिनी विठ्ठलाच्या भाजी-पोळी केंद्रात लाडू
अविरत सेवा : अंध अपंगांना मोफत भोजन
अमरावती : शहरातील अंध अपंगांना मिष्ठान्न मिळावे यासाठी विठ्ठल सोनवळकर यांच्या भाजी-पोळी केंद्रात हिंदू संस्कृतीतील मोठ्या सणांना पक्वानांचा बेत आखला जातो. विशेष म्हणजे अंध अपंगांना त्याचे मोफत वितरण केले जाते. येत्या महाराष्ट्र दिनी १ मे रोजी या भाजी-पोळी केंद्रात मोतीचुरच्या लाडवाचा बेत आखला आहे.
अलीकडच्या काळात समाजसेवकांचे पेव फुटले आहे. रुग्णालयात फळांचे वाटप करणाऱ्या समाजसेवकांनी कमी नाही. परंतु कटला गाडीवर गॅस वेल्डींगचा व्यवसाय करून त्यातून मिळणाऱ्या मिळकतीतून गोरगरीबांना दोन गोड घास खाऊ घालणाऱ्या विठ्ठल सोनवळकरांचे काम म्हणजे गाडगेबाबांच्या विचाराचे केलेले अनुकरण होय. गेल्या २७ वर्षापासून शहरातील गोरगरीब, अंध, अपंग तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दोन रूपयात दोन पोळ्या, वरण, पोळीचे जेवण दिले जाते. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीतील मोठ्या सणांना तसेच राष्ट्रीय सणांना शहरातील गोरगरीब, अंध, अपंगांना मिष्टान्नाचे मोफत भोजन देण्याचा त्यांचा उपक्रमही निरंतर सुरू आहे. (प्रतिनिधी)