शेतकरी अपघात विम्याबद्दल जनजागृतीचा अभाव
By Admin | Updated: May 20, 2016 00:19 IST2016-05-20T00:19:38+5:302016-05-20T00:19:38+5:30
शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास शासनाकडून त्याच्या वारसाला दोेन लाख रूपयांची मदत देण्याचे प्रावधान गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत करण्यात आले आहे.

शेतकरी अपघात विम्याबद्दल जनजागृतीचा अभाव
विदारक वास्तव : अनेक लाभार्थी वंचित
दर्यापूर : शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास शासनाकडून त्याच्या वारसाला दोेन लाख रूपयांची मदत देण्याचे प्रावधान गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत करण्यात आले आहे. परंतु या लाभदायक योजनेबद्दल पुरेशी जनजागृती नसल्याने या योजनेपासून शेतकरी वंचित राहत आहेत.
या योजनेंतर्गत शासनामार्फत विमा संरक्षण दुप्पट करण्यात आले आहे. परंतु योजनेसंदर्भात संबंधित विभागाने जनजागृतीकडे अजिबात लक्ष दिलेले नाही. शहरात योजनेसंदर्भात प्रचार पत्रकांचे पाहिजे त्या प्रमाणात वाटप करण्यात आलेले नाही. तसेच प्रचारासाठी प्रसिध्दी माध्यमांचादेखील पुरेसा वापर झाला नसल्याचे दिसते. त्यामुळे मागील पाच महिन्यांपासून तालुक्यातून एकही प्रस्ताव आलेला नाही. यावरून शासकीय योजना राबविण्याबाबत अधिकारी किती गंभीर आहेत, हे दिसून येते.
अनेकदा शेतीची कामे करताना शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू होतो. कुटुंबातील कर्ता पुरूषच गेल्याने त्याचे कुटुंब वाऱ्यावर येतात. सातत्याने उदभवणारी दुष्काळी स्थिती, नापिकी आणि त्यामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या या बाबी लक्षात घेऊन शासनाने या विमा योजनेच्या लाभाची रक्कम दुप्पट केली आहे. पूर्वी अपंगत्व आल्यास अथवा एखादा अवयव निकामी झाल्यास ५० हजारांचे अनुदान मिळत होते. आता ते एक लाखावर पोहोचले आहे.
रक्कम दुप्पट केल्यानंतर योजनेला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा शासनाला होती. मात्र, अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे व सुस्तावलेल्या धोरणामुळे योजनेला पाहिजे तेवढी प्रसिध्दीच मिळालेली नाही. परिणामी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही. (प्रतिनिधी)