कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने ग्राहक त्रस्त
By Admin | Updated: October 27, 2015 00:21 IST2015-10-27T00:21:51+5:302015-10-27T00:21:51+5:30
मेळघाटात धार्मिक उत्सवादरम्यान वीज कंपनीने शहरात सहा तास तर ग्रामीण भागात दहा तासांचे अघोषित भारनियमन सुरू केले.

कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने ग्राहक त्रस्त
भारनियमनाचा वैताग : शासकीय कार्यालयातील कामकाज प्रभावित
धारणी : मेळघाटात धार्मिक उत्सवादरम्यान वीज कंपनीने शहरात सहा तास तर ग्रामीण भागात दहा तासांचे अघोषित भारनियमन सुरू केले. सोबतच उर्वरित वेळेतही अत्यंत कमी दाबाचा वीज पुरवठ्याचा तडकाही लावत असल्यामुळे शासकीय कार्यालयातील संगणक व इतर कामे ठप्प झाली आहेत. तालुक्यातील शेतकरीही त्रस्त झाल्याने वीज वितरण विभागाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नवरात्री, विजयादशमीसह मोहर्रम, दिवाळी असे महत्वाचे वार्षिक धार्मिक सण, उत्सव लागोपाठ साजरे झाले. मात्र धारणी येथील वीज वितरण विभागाकडून भारनियमन व कमी विद्युत दाबाची अधिकृत सूचना वेळापत्रक जाहीर न करताच गेल्या एक महिन्यापासून धारणी शहरात सहा तासाचे भारनियमन आणि तालुक्यातील ग्रामीण विभागात दहा तासापेक्षाही जास्तीचे अघोषित भारनियमन सुरू केले. त्यामध्ये अधिकचा तडका म्हणून उर्वरित वेळेत सुद्धा कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने तब्बल २० तास भारनियमन असल्यासारखे नागरिक अनुभव घेत आहे. यामुळे शासकीय कार्यालयाचे संगणक संच, बँकेचे व्यवहार, आॅनलाईन फॉर्म, सातबारा, ई प्रक्रिया शेतातील विद्युत मोटरपंप पूर्णपणे निकामी झाले आहे. यावर्षी पाऊस कमी आल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र रब्बी पिकांच्या वेळेतही भारनियमासह कमी दाबाचा वीज पुरवठा असल्यामुळे रबी पिकेही धोक्यात आली आहेत. सध्या हिवाळ्यात कडक ऊन असल्याने तालुक्यातील कित्येक शेतकऱ्यांनी हरभरा, गव्हाची पेरणीसुद्धा केलेली नाही. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे त्यांना विद्युत विभागाने त्रस्त करून सोडले असून पूर्ण विद्युत मोटरपंप निकामी झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)