मोर्शी रेल्वे स्थानकावर सुविधांचा अभाव
By Admin | Updated: May 7, 2015 00:06 IST2015-05-07T00:06:01+5:302015-05-07T00:06:01+5:30
नरखेड-अमरावती मार्गावरील मोर्शी रेल्वे स्थानकावरील संगणकीय आरक्षण प्रणालीचा, शिवाय पॅसेंजर रेल्वेचाही मोठ्या ....

मोर्शी रेल्वे स्थानकावर सुविधांचा अभाव
प्रवाशांचे हाल : रेल्वे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
मोर्शी : नरखेड-अमरावती मार्गावरील मोर्शी रेल्वे स्थानकावरील संगणकीय आरक्षण प्रणालीचा, शिवाय पॅसेंजर रेल्वेचाही मोठ्या प्रमाणात नागरिक लाभ घेत असले तरी प्राथमिक सोयींचा अभाव येथे प्रवाशांना प्रकर्षाने जाणवत आहे.
नरखेड-अमरावती या रेल्वे मार्गावर सध्या दोन साप्ताहिक रेल्वे धावत आहेत; तथापि या रेल्वे गाड्यांनी येथील बहुतांश नागरिक प्रवास करतात. रेल्वे स्थानकावरुन दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करतात.
शिवाय तिकिटांच्या आरक्षणाकरिताही येतात. रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत थंड पाण्याचे यंत्र या ठिकाणी बसविलेले नाही. रेल्वे स्थानकावर प्रवाशांना बसण्याकरिता बेंचची व्यवस्था करण्यात आलेली नाही. आरक्षण कक्षासमोरही पुरेशी व्यवस्था उपलब्ध नाही. या गैरसोयी रेल्वे प्रशासनाने दूर करणे आवश्यक असून त्याकरिता लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
अमरावती-नरखेड रेल्वे मार्ग सुरु होण्यापूर्वी अमरावती-जबलपूर या रेल्वे गाडीची घोषणा झाली होती. ही रेल्वे गाडी अमरावती-नरखेड या मार्गावरुन सुरु होणार होती; तथापि मार्ग पूर्णत्वास जाण्यापूर्वी ही रेल्वे गाडी नागपूरमार्गे सुरु करण्यात आली. ही रेल्वे गाडी पूर्ववत मोर्शी-नरखेड मार्गाने सुरु करण्यात यावी, अशीही मागणी केली जात आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास प्रवाशांना विचार करावा लागेल, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)
सुविधेचा अभाव
मोर्शी ते चांदूरबाजार या राज्य मार्गाला जोडून रेल्वे स्थानकाकडे रस्ता जातो. या रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडुपी मोठ्या प्रमाणात वाढली असून ती रस्त्यावर आलेली आहे. त्यामुळे या मार्गावरुन आॅटोरिक्षातून आणि मोटार सायकलीवरुन रेल्वे स्थानकाकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना काटेरी झुडुपीच्या फटक्यांमुळे इजा होत आहे. या मार्गाच्या देखरेखीची जबाबदारी रेल्वे प्रशासनाकडे असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
फुकट्यांना
आवर घाला !
नरखेड-अमरावती रेल्वे मार्गावरील मोर्शी आणि वरुड या दोन्ही रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणीसाची व्यवस्था रेल्वे प्रशासनाने आतापावेतो केलेली नाही. पॅसेंजर रेल्वे गाड्यांमधून मोठ्या प्रमाणात फुकटे प्रवास करीत असल्याचे चित्र आहे. या फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रेल्वे स्थानक आणि चालत्या रेल्वे गाड्यांमधून प्रवाशांच्या तिकिटाची तपासणी आणि स्थानकावर तिकीट चेकरची नियुक्ती करणे आवश्यक आहे.
नवीन रेल्वे
गाड्यांची मागणी!
मोर्शी-वरुड-नरखेड हा प्रदेश संत्रा उत्पादकांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. येथे थेट उत्तरेकडील संत्रा व्यापारी आणि अडते संत्रा खरेदी करण्याकरिता येतात. शिवाय संत्रा उत्पादकांचासुध्दा दिल्लीसह उत्तरेकडील शहरांशी संपर्क येतो आणि त्यांचे येणे-जाणेसुध्दा सातत्याने राहते. त्यासाठी अमरावती-नरखेड या मार्गे थेट अमरावती ते दिल्ली ही रेल्वे गाडी सुरु करण्यात यावी, अशी संत्रा उत्पादकांची मागणी आहे.