शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2016 00:21 IST2016-05-23T00:21:43+5:302016-05-23T00:21:43+5:30
उन्हाचा पारा ४५ ते ४६ अंश सेल्सिअसवर पोहोचत असताना रक्तदात्यांची संख्या देखील कमालीची रोडावली आहे.

शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा
रुग्णांचे जीव धोक्यात : तापमानात वाढ, रक्तदान शिबिरे मंदावली
अमरावती : उन्हाचा पारा ४५ ते ४६ अंश सेल्सिअसवर पोहोचत असताना रक्तदात्यांची संख्या देखील कमालीची रोडावली आहे. परिणामी शासकीय रक्तपेढीत रक्तसंकलन कमी तर मागणी अधिक अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल गरीब, सामान्य रूग्णांना वेळीच रक्तपुरवठा होत नसल्याने त्यांचे जीव धोक्यात आले आहेत. हल्ली ३० ते ४० टक्के रक्ताची कमतरता जाणवत आहे.
जिल्ह्यात पाच रक्तपेढ्या आहेत. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची रक्तपेढी तर चार खासगी रक्तपेढ्या आहेत. यात येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय रूग्णालय, बालाजी रक्तपेढी तर बडनेरा येथील संत गाडगेबाबा रक्तपेढी, अचलपूर येथील वर्मा ब्लड बँकेचा समावेश आहे.
रक्तदान शिबिरांची संख्या रोडावली
अमरावती : जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या रक्तपेढीतून येथील जिल्हा स्त्री रुग्णालय, दर्यापूर, अचलपूर, धारणी, चिखलदरा, चुरणी, मोर्शी व वरुड येथील उपजिल्हा रुग्णालयातील स्टोरेज केंद्रात रक्त पुरवठा केला जातो. मात्र मार्च महिन्यापासून रक्तपेढीत रक्ताची कमतरता ही नित्याचीच बाब झाली आहे. मार्च ते मे या दरम्यान रक्तदान शिबिरांची संख्या सुद्धा कमी झाली आहे. तर दुसरीकडे जिल्हा स्त्री रुग्णालयात दरदिवसाला १५ ते २० रक्ताच्या पिशव्या पुरवठा करताना शासकीय रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात १९२४ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून फेब्रुवारीत ७८४, मार्च ७३१, एप्रिल १०५० तर मे महिन्यात ७२८ जणांनी रक्तदान केल्याचे अभिलेखात नोंद आहे.
यंदा फेब्रुवारी ते मे या दरम्यान रक्त संकलनाची संख्या फारच कमी आहे. मात्र, त्या तुलनेत इर्विन, डफरीन, सुपर स्पेशालिटीसह शासकीय आठ स्टोरेज केंद्रे, खासगी रुग्णालयांमध्ये रक्त पुरवठा करण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीला पार पाडावी लागते. तसेच इर्विनच्या डे केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येणाऱ्या सिकलसेल, हिमोफेलिया व थायलेसिला रुग्णांनाही मोफत रक्तपुरवठा करावा लागतो.
गत आठ दिवसांपासून जिल्हा स्त्री रुग्णालयात रक्ताची मागणी वाढल्याने बहुतांश गर्भवती मातांना वेळेत रक्तपुरवठा करता येत नाहीे, हे वास्तव आहे. रक्तपेढीत ठेवण्यात येणाऱ्या रक्ताचे आयुष्य हे साधारणत: ४२ दिवस राहते. प्रसंगी रक्तपेढीत आवश्यक ब्लड गृ्रप उपलब्ध नसले की, नोंदी असलेल्या रक्तदात्यांना अशा वेळी बोलावून त्यांच्याकडून रक्तदान करवून घेतले जाते. मागणीनुसार रक्ताचा पुरवठा केला जातो. परंतु मार्चपासून तापमानात वाढ झाल्याने अनेकांनी रक्तदानापासून पाठ फिरवली आहे. परिणामी शासकीय रक्तपेढीत रक्ताची कमतरता जाणवू लागली आहे. (प्रतिनिधी)