चैलीवरून वीज तारेवर कोसळल्याने मजूर भाजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST2019-12-26T05:00:00+5:302019-12-26T05:00:28+5:30
विजेचा जबर धक्का व खाली कोसळून मजुराचे हाड मोडल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान तेथे पोहोचलेल्या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांचे नितीन मोहोड यांच्याशी शाब्दिक चकमक झाल्याने गोंधळ उडाला होता.

चैलीवरून वीज तारेवर कोसळल्याने मजूर भाजला
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एमआयडीसी मार्गावरील लॉर्ड्स हॉटेलमध्ये बांधकाम स्थळावरील चैलीवरून विजेच्या तारेवर कोसळलेला मजूर गंभीररीत्या भाजल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. रामदास पूर्णाजी वानखडे (६५ रा.राजापेठ) असे भाजलेल्या मजुराचे नाव आहे. विजेचा जबर धक्का व खाली कोसळून मजुराचे हाड मोडल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान तेथे पोहोचलेल्या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांचे नितीन मोहोड यांच्याशी शाब्दिक चकमक झाल्याने गोंधळ उडाला होता.
लॉर्ड्स हॉटेलमध्ये बांधकाम सुरू असून, इमारतीच्या बाहेरील भागाच्या कामाकरिता चैली बांधण्यात आल्या आहेत. बुधवारी सकाळी मजूर रामदास वानखडे चैलीवर चढून काम करीत होता. दरम्यान चैलीतोल जाऊन रामदास हे २० ते २५ फुटांवरील चैलीवरून खाली कोसळले. दरम्यान १५ फुटांवर असणाºया विद्युत तारेवर कोसळल्याने शॉर्ट सर्कीट झाला आणि रामदास वानखडे विद्युत शॉक लागून भाजल्या गेले. त्यानंतर ते तेथून खाली जमिनीवर कोसळले. यात रामदास वानखडे हे गंभीररीत्या भाजल्या गेले. तसेच या घटनेत त्यांचे हाडसुद्धा मोडले. ही बाब सहकारी मजुरांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ रामदास वानखडे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. दरम्यान रामदास वानखडे यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने भीम आर्मी आणि भीम ब्रिगेडचे पदाधिकारीदेखील तेथे पोहोचले. त्याचवेळी लाडर््स हॉटेलचे मालक, त्यांचे भाऊ व नितीन मोहोड तेथे पोहोचले. यावेळी भीम आर्मीचे पदाधिकारी व नितीन मोहोड यांच्यात शाब्दिक वाद उफाळला. प्रकरण कोतवालीत पोहोचले. कोतवाली ठाण्यातही मोहोड व अमोल इंगळे यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
लॉर्ड्स हॉटेलमधील ही घटना आहे. हॉटेल संचालकासह बार असोसिएशनचे पदाधिकारी नितीन मोहोड जखमी मजुराला पाहण्यासाठी इर्विन रुग्णालयात पोहोचले. भीम आर्मीचे पदाधिकारी व नितीन मोहोड यांच्या तू-तू मै-मै झाली. भीम आर्मीच्या तक्रारीवरून चौकशी सुरू आहे.
- शिवाजी बचाटे, पोलीस निरीक्षक, कोतवाली ठाणे
असोसिएशन अध्यक्ष म्हणून मी तेथे पोहोचलो. जातीवाचक आरोप करण्याचे काही कारण नाही. ८० टक्के बौद्ध समाज बांधव माझ्यासोबत काम करतात. हॉटेल व ऑटो युनियनमध्ये त्यांचा सहभाग आहे. बौद्ध धर्माचा मी आदर केला आहे. त्यांचे हे आरोप चुकीचे आहे.
- नितीन मोहोड, अध्यक्ष, हॉटेल अॅन्ड बार असोसिएशन
नितीन मोहोड यांच्याविरुद्ध तक्रार
हरियाली हॉटेलचे संचालक नितीन मोहोड यांनी आमच्यावर दबाव टाकून जखमी इसमाला मदत देऊ नका, असे भाष्य करून जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपाची तक्रार भीम आर्मीने कोतवाली पोलिसात दिली. यावेळी भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेशप्रमुख मनीष साठे, अमोल इंगळे, सिद्धार्थ गवई, मनोज मेश्राम, प्रवीण वाकोडे, बंटी रामटेके, प्रवीण बंसोड, किशोर सरदार उपस्थित होते. त्यांच्याविरुद्ध अॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्याची मागणी त्यांनी केली.