अन्यायाविरुद्ध प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By Admin | Updated: August 1, 2015 01:41 IST2015-08-01T01:41:37+5:302015-08-01T01:41:37+5:30
सुधारित आकृतिबंध अहवालातील त्रुटी दूर करून प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी समन्वय समितीने सुधारित ...

अन्यायाविरुद्ध प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचे आंदोलन
अमरावती : सुधारित आकृतिबंध अहवालातील त्रुटी दूर करून प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी समन्वय समितीने सुधारित अहवाल तयार केला. परंतु या समितीतील मोजके सदस्य प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यासाठी चुकीचा अहवाल शासनाला सादर करण्याकरिता दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे़ असे झाल्यास राज्यातील १५ हजार प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांनी एकाच दिवशी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबांसमवेत उपोषणाला बसण्याचा निर्णय राज्यात घेतला आहे़
प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाची आज विदर्भातील वाशिम येथे राज्यध्यक्ष गोपाळराव कारेमोरे, सदानंद दाभाडकर, कोकण विभागातील सिंधुदुर्ग येथे नंदकुमार खडगे, पश्चिम महाराष्ट्रात सातारा येथे राज्य सचिव भरत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आज एकाच दिवशी बैठकी घेण्यात आल्यात. विदर्भातील बैठकीला मराठवाड्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते़ राज्य शिक्षण समन्वय समितीने तीन बैठकी आजपर्यंत घेतल्यात. या बैठकीला प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाचे प्रदेश सचिव भरत जगताप, सर्व संघटनेचे पदाधिकारी, राज्य शासनाचे शिक्षण विभागातील पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शून्य ते ३०० विद्यार्थ्यांसाठी एक प्रयोगशाळा परिचर असावा, राज्यातील हे कर्मचारी तृतीय दर्जात मोडत असल्यामुळे त्यांना अतिरिक्त ठरवू नये, चिपळूणकर व गोगटे समिती यांचा अहवाल विचारात घेऊन प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचे आॅनलाईन वेतन देण्यात यावे, असे ठरविण्यात आल्यानंतर समन्वय समितीच्या तीन बैठकीला केवळ एकच वेळा उपस्थित राहिलेल्या एका सदस्यांनी प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न चालविला आहे़ अनेक वर्षांपासून राज्यातील प्रयोगशाळा कर्मचारी इमाने-इतबारे आपले कर्तव्य बजावीत असताना अशा सदस्यांना शासन पाठीशी घालून तब्बल १५ हजार कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत असेल तर शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर एकाच दिवशी कुटुंबांसमवेत उपोषणाला बसणार असल्याचा निर्णय राज्यातील तीनही विभागात झालेल्या बैठकीत घेण्यात आला़
समन्वय समितीच्या बैठकीत राज्याचे शिक्षण आयुक्त हे अध्यक्ष असून या समितीत १२ सदस्य आहेत. समितीच्या बैठकीला उपस्थित न राहता केवळ प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्काच्या मागणीला विरोध करणे चुकीचे आहे़ प्रयोगशाळा कर्मचारी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल, लिपिकांना या सुधारित अहवालातून न्याय मिळणे गरजेचे आहे़ त्यामुळे कोणीही या प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचे सकारात्मक अहवालाला असमर्थतता दाखवून या कर्मचाऱ्यांचा विरोध ओढवून घेऊ नये, असा इशारा सोमवारी प्रयोगशाळा कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव भरत जगताप यांनी सातारा येथे आयोजित प्रयोगशाळा कर्मचारी संघटनेच्या बैठकीतून दिला आहे़ (प्रतिनिधी)