कुल्फी विक्रेत्याची हत्या की आत्महत्या ?
By Admin | Updated: June 5, 2015 00:39 IST2015-06-05T00:39:46+5:302015-06-05T00:39:46+5:30
नजीकच्या शहापूर येथे कुटुंबासह ३० वर्षीय युवक कुल्फी विकण्याकरिता उत्तरप्रदेशातून आला होता.

कुल्फी विक्रेत्याची हत्या की आत्महत्या ?
चर्चेला ऊत : पत्नीसोबत झाला होता वाद
वरुड : नजीकच्या शहापूर येथे कुटुंबासह ३० वर्षीय युवक कुल्फी विकण्याकरिता उत्तरप्रदेशातून आला होता. मंगळवारी दिवसभर व्यवसाय करुन सायंकाळी ६ वाजता घरी आल्यांनतर पत्नीसोबत त्याचे भांडण झाल्याचे सांगण्यात येते. मात्र सकाळी युवकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. यामुळे या युवकाची हत्या की, आत्महत्या हा चर्चेचा विषय ठरला आहे.
प्राप्त माहितीनुसार, अरविंदकुमार राजाराम कुमार (३०, रा.रामपुरा (नेवाडा उत्तरप्रदेश) असे आहे. मृत हा दरवर्षी वरुड तालुक्यात कुल्फी विकण्याकरिता येत होता. यावर्षीसुध्दा पत्नी आणि दोन मुलीसह शहरापूर येथे येऊन कुल्फी विकण्याचे काम करीत होता.
मंगळवारी सायंकाळी ६ वाजतादरम्यान कुल्फी विकून घरी आला तेव्हा तो दारुच्या नशेत असल्याचे सांगण्यात येते. यामुळे पत्नीसोबत भांडण झाले. यानंतर रात्री ११ वाजताच्या दरम्यान तो घरी असल्याचे पत्नी पाहिले होते. परंतु सकाळी ७ वाजता पत्नीला तो खिडकीला दुपट्टा बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
पत्नीने आरडाओरड करुन शेजारी तसेच मृताचे चुलतभावांना बोलावून गळफास काढला असता त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र मृत अरविंदच्या गळ्यावर जखमा आढळल्याने कुणी त्याला मारुन गळफास लावला असावा, अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या घटनेची माहिती वरुड पोलिसांना दिल्यावरुन घटनास्थळावर ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र मस्कर, शिवपाल दाबेराव, शेषराव कोकरे, देशमुख यांनी जाऊन घटनास्थळी पंचनामा केला.
मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. प्रथमदर्शनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदन अहवालानंतर पुढील तपास केला जाणार असल्याचे समजते. पुढील तपास वरुड पोलीस करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)