अचलपुरात भर उन्हात व्यापाऱ्यांची कोविड चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:14 IST2021-03-17T04:14:34+5:302021-03-17T04:14:34+5:30
परतवाडा : अचलपूर कुटीर रुग्णालयात आयोजित कोविड चाचणीच्या ठिकाणी व्यापाऱ्यांसह अन्य जणांची एकच गर्दी उसळली होती. चाचणी करण्याकरिता आलेल्यांच्या ...

अचलपुरात भर उन्हात व्यापाऱ्यांची कोविड चाचणी
परतवाडा : अचलपूर कुटीर रुग्णालयात आयोजित कोविड चाचणीच्या ठिकाणी व्यापाऱ्यांसह अन्य जणांची एकच गर्दी उसळली होती. चाचणी करण्याकरिता आलेल्यांच्या भर उन्हात रांगा लागल्या होत्या. ना बसण्याची सोय ना पिण्याचे पाणी, ना फिजिकल डिस्टन्सिंग. सर्वत्र एकच गर्दी एकच गोंधळ. यामुळे व्यापारी चांगलेच संतप्त झाले होते.
व्यापाºयांनी आपल्या भावना प्रशासनासह आरोग्य विभागाच्याही कानी टाकल्यात. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक सुरेंद्र ढोले यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी संवाद साधत कल्याण मंडपममध्ये दुसरा कॅम्प आयोजित केला. तेथेही व्यापाऱ्यांनी गर्दी केली. कल्याण मंडपममध्ये केवळ दीडशे लोकांचीच कोरोना चाचणी केली गेली. आमचे टारगेट संपल्याचे कारण देत कल्याण मंडपमधील हा कॅम्पही आरोग्य विभागाकडून गुंळाडल्या गेला. यात अनेक व्यापाºयांना चाचणी न करताच परतावे लागले. १५ मार्चला हा प्रकार घडला.
प्रशासन व आरोग्य विभागाकडूनच व्यापाऱ्यांसह लहान मोठ्या विक्रेत्यांना कोविड चाचणी बंधनकारक केल्या गेली. प्रमाणपत्र नसेल तर दंडात्मक कारवाईसह व्यवसाय, दुकान सील करण्याचे सांगण्यात आले आहे. यावरून लहान मोठे व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक व त्यांच्याकडील कामगार कोविड चाचणी करुन घेण्यात पुढे सरसावले आहेत. अचलपूरची परिस्थिती बघता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी पंचायत प्रशासनासह आरोग्य यंत्रणेला १३ मार्चला सक्त निर्देश दिलेत. यावर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तालुक्यातील १६ गावांमध्ये १३ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान १६ कोविड टेस्टिंग कॅॅम्प आयोजित केले आहेत. यावर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांची स्वाक्षरी आहे. यात स्वॅब तपासणी कॅम्पची संपूर्णतयारी ग्रामपंचायत कार्यालयावर टाकण्यात आली आहे.
बॉक्स
३० जण पॉझिटिव्ह
१४ मार्चला देवमाळीत एकूण १९५ लोकांची रॅपिड अॅन्टिजन टेस्ट केली गेली. यात देवमाळी येथील ६, परतवाड्यातील ४, अचलपूरमधील ७, निंभारी, पोही व तळेगाव मोहना येथील प्रत्येक एक या प्रमाणे ३० लोक कोरोना पॉझिटिव्ह निघाले. येसुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, देवमाळीच्या सरपंचा पदमा सोळंके, उपसरपंच शैलेश म्हाला, सचिव ताज पठाण, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल सरोदे, रावसाहेब रहाटे, आरोग्य कर्मचारी अरविंद पिहुलकर यांनी देवमाळीतील हा कॅम्प यशस्वी केला.
२१ मार्चला देवमाळीत परत कोविड चाचणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.