कोदोरी गावात आरोग्य चमू दाखल
By Admin | Updated: August 12, 2014 23:28 IST2014-08-12T23:28:58+5:302014-08-12T23:28:58+5:30
चांदूरबाजार तालुक्यातील २६८ लोकसंख्येच्या कोदोरी गावात जिल्ह्याची आरोग्य चमू दाखल झाली असून या चमूने तापीच्या रुग्णांचे सर्व्हेक्षण करुन औषधोपचार व रक्ताचे नमूने घेणे सुरु केले आहे.

कोदोरी गावात आरोग्य चमू दाखल
तापाचे नऊ रुग्ण : आरोग्य विभागाने डेंग्यू रुग्णाचा दावा फेटाळला
चांदूरबाजार : चांदूरबाजार तालुक्यातील २६८ लोकसंख्येच्या कोदोरी गावात जिल्ह्याची आरोग्य चमू दाखल झाली असून या चमूने तापीच्या रुग्णांचे सर्व्हेक्षण करुन औषधोपचार व रक्ताचे नमूने घेणे सुरु केले आहे. या गावात तापाचे नऊ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाची चमू आरोग्य तपासणी करीत आहे.
कोदोरी गावात डेंग्यू सदृष्य आजाराची लागण झाल्याचे काही खासगी डॉक्टरांनी सांगितल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही माहिती मिळताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. मंगळवारी सकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, सहायक आरोग्य अधिकारी चऱ्हाटे, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहोड, ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी पाचघरे तसेच जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाचे किटर समरक भोजराज माहुरे व आरोग्य सेवक तसेच आशा वर्कर यांनी कोदोरी गावाला भेट दिली.
हिवताप अधिकाऱ्यांच्या चमूने ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावात तापीच्या रुग्णांचे सर्व्हेक्षण करुन तपासणी व औषधोपचार सुरु केला आहे. तसेच तापीच्या रुग्णांचे रक्त नमूने घेणे सुरु केले आहे.
कोदोरी गावातील नऊ लोकांना तापाची लागण झाली असून यातील अमरावती व चांदूरबाजार येथील खासगी रुग्णालयात प्रत्येकी दोन तर परतवाड्यात एक रुग्ण उपचार घेत आहे. यासह तापीचे चार रुग्ण गावातच उपचार घेत असल्याचे वैद्यकीय तपासणी दरम्यान आढळून आले. (शहर प्रतिनिधी)