मायक्रो फायनान्सच्या अधिकाऱ्यांना ठोका
By Admin | Updated: December 29, 2016 01:41 IST2016-12-29T01:41:58+5:302016-12-29T01:41:58+5:30
मायक्रो फायनान्स कंपन्यांचे अधिकारी वसुलीसाठी तुमच्या दारात आले की त्यांना ठोकून काढा,

मायक्रो फायनान्सच्या अधिकाऱ्यांना ठोका
नवनीत यांचा महिलांना सल्ला : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रवी राणा आक्रमक
अमरावती : मायक्रो फायनान्स कंपन्यांचे अधिकारी वसुलीसाठी तुमच्या दारात आले की त्यांना ठोकून काढा, असा सल्ला नवनीत राणा यांनी बचतगटाच्या महिलांना दिला. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करुन त्यांचा सातबारा कोरा करण्याची आक्रमक मागणी बडनेऱ्याचे आमदार रवि राणा यांनी केली. राणा दाम्पत्याच्या नेतृत्त्वात काढण्यात आलेल्या महामोर्चाला राणा दाम्पत्य संबोधित करीत होते.
युवा स्वाभीमान पक्षाच्यावतीने स्थानिक राजापेठ ते जिल्हाकचेरी दरम्यान शेतकरी, गोरगरीब, बचतगटाच्या महिला, कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी महामोर्चा काढण्यात आला. दुपारी १२ वाजता निघालेला मोर्चा दुपारी ३ वाजताच्या सुमारास जिल्हाकचेरीवर धडकला. मोर्चात राणा दाम्पत्य पायी सहभागी झाले होते. मोर्चात महिलांची गर्दी लक्षणीय ठरली. इर्विन चौकात आ. रवि व नवनीत राणा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर मोर्चा कलेक्ट्रेटकडे रवाना झाला.
डीसीपीची पिछेहाट, बैलगाडीनेच गाठले कलेक्टरेट
सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी राणा दाम्पत्याने काढलेला मोर्चा जिल्हाकचेरीवर पोहोचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यासाठी हे बैलगाडीवरुन जाण्याचा आग्रह आ.रवि राणा यांनी धरला. डीसीपी शशीकुमार मिणा यांनी मनाई केली. अखेर पोलिसांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची भेट घेऊन राणांची मागणी कथन केली. राणांचा आग्रह प्रशासनाने मान्य केला. बैलगाडीने जाऊन राणा दाम्पत्याने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
कलेक्टर आले दालनाबाहेर
राणा दाम्पत्याच्या नेतृत्वात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी दालनाबाहेर येऊन स्वीकारावे, अशी विनंती आ. रवि राण यांनी केली. राणांची विनंती मान्य करून जिल्हाधिकारी किरण गित्ते हे दालनाबाहेर आले आणि त्यांनी निवेदनाचा स्वीकार केला.
या प्रमुख मागण्यांसाठी काढला मोर्चा
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, प्रती एकर २५ हजार रुपये नुकसान भरपाई, गरीब, सामान्य व भाडेकरुंना घरकूल योजनेचा लाभ, झोपडपट्ट्यांतील रहिवाशांना हक्काचे घर, निराधार योजनेच्या अनुदानात वाढ, बडनेरात तहसील, भूमीअभिलेख कार्यालयाची स्थापना, बडनेरा-नांदगावपेठ एमआयडीसीपर्यंत मेट्रो रेल्वे, हॉकर्स झोन, केशरी रेशनकार्ड धारकांना धान्य, मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाचातून महिलांची सुटका करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश निवेदनात होता.
पोलिसांची तारांबळ
बैलगाडीवरुनच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास जाण्याचा आग्रह आ. राणांनी धरला. त्यामुळे पोलिसांची काही वेळ तारांबळ उडाली. बंदोबस्तातील पोेलिस अधिकाऱ्यांनी वरिष्ठांसोबत संपर्क साधून याबाबत माहिती दिली. दरम्यान आ. राणांनी जिल्हाधिकारी गित्ते यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून बैलगाडीवरुन येण्याची परवानगी मागितली. जिल्हाधिकाऱ्यांनी राणांच्या मागणीला होकार देताच पोलिसांचा तणाव निवळला.