एटीएममध्ये खडखडाट, मग कार्ड कशाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST2021-06-02T04:11:58+5:302021-06-02T04:11:58+5:30
उद्यापासून शिक्षक बँक सेवा सुरू करणार सुविधा नावापुरतीच : जिल्हाधिकाऱ्यांचा लक्षवेध श्यामकांत पाण्डेय धारणी : ‘डिजिटल इंडिया’चा ...

एटीएममध्ये खडखडाट, मग कार्ड कशाला?
उद्यापासून शिक्षक बँक सेवा सुरू करणार
सुविधा नावापुरतीच : जिल्हाधिकाऱ्यांचा लक्षवेध
श्यामकांत पाण्डेय
धारणी : ‘डिजिटल इंडिया’चा नारा केंद्र शासनाने दिला असला तरी मेळघाटातील एटीएम सेवा नेहमीच आजारी असते. त्यात कायम खडखडाट असल्याने ऑनलाईन व्यवहार हे आव्हानच आहे. मग, बँकेच्या ग्राहकांना कार्ड कशाला दिले, असा प्रतिप्रश्न आदिवासी बांधव करीत आहेत.
धारणी तालुक्यात भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र बँक आणि सेंट्रल बँकेची एटीएम सेवा सुरू करण्यात आली. मात्र, ही सेवा प्रारंभापासूनच ढेपाळली आहे. सद्यस्थितीत धारणी तालुक्यातील तिन्ही बँकांच्या एटीएममध्ये रोख नसल्यामुळे खातेदारांना इकडे-तिकडे भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने बँकांच्या कामकाजावरही परिणाम होत आहे. यादरम्यान धारणी येथील शिक्षक बँकेत एटीएम सेवा २ जूनपासून सुरू होत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचे एटीएम डोकेदुखी ठरली असताना, हे नवे एटीएम कितपत सक्षम राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.